सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेचा क्रीडा महोत्सव होवू शकला नाही. राज्यातील अन्य काही जिल्हा परिषदेत गतवर्षी क्रीडा महोत्सव झाल्याचे येथील सीईओ यांच्याकडून समजल्यावर मला थोडे वाईट वाटले होते. यावर्षी हा महोत्सव होत असला तरी थोडा उशिरा होत आहे. तरीही जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती लक्षवेधी आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूने खिलाडू वृत्ती जोपासत ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या क्रीडा महोत्सवाला येथील पोलीस परेड मैदानावर आज प्रारंभ झाला. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी स्मशाल प्रज्वलित करून याचा दिमाखात प्रारंभ झाला. १ आणि २ फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धा रंगणार आहेत. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, अरुण चव्हाण, वासुदेव नाईक, श्री भोई आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी तसेच मुख्यालय असे एकूण नऊ ठिकाणचे खेळाडू यात सहभागी झाले आहेत. उद्घाटन नंतर मुख्यालय पत्रकार व अधिकारी – कर्मचारी यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. यात अधिकारी आणि कर्मचारी संघाने विजय मिळविला.












