एचडीएफसी बँकेने केला सरपंचांचा सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : खेड्यांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी बदलत्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक बँकांसोबत आता खाजगी बँकाही आपले योगदान देत आहेत. तालुक्यातील सरपंचाचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम एचडीएफसी बँकेच्या कणकवली शाखेने केल्याचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले. एचडीएफसी बँक शाखा कणकवली च्या वतीने कणकवली तालुक्यातील सर्व सरपंचाचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार कणकवली पं. स. च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आला.त्यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी श्री. सूर्यकांत वारंग, श्री. सुनील पांगम, श्री. रविकांत मेस्त्री, श्री. प्रमोद ठाकूर, श्री रामचंद्र शिंदे, कृषी अधिकारी श्री. सुभाष पवार व श्री. सतीश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना एचडीएफसी बँक व्यवस्थापक मंगेश जाधव म्हणाले की, ग्रामविकासासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी एचडीएफसी बँक नेहमीच सकारात्मक आहे. एचडीएफसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील युवा उद्योजकांनी आपला उद्योगधंदा सुरू करावा. ग्रामीण विकासाचा गाडा प्रथम नागरिक या नात्याने सरपंच चालवत असतात.त्यासाठीच कणकवली तालुक्यातील सरपंचाचा सत्कार एचडीएफसी बँकेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. मंगेश जाधव आणि श्री. ब्रँच सेल्स ऑफिसर संदीप गजोबार यांनी बँकेच्या विविध सेवांविषयी व इतर योजनाविषयीं मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी राकेश मिरजुले, प्रथमेश दळवी, श्रीधर बाक्रे यांचे सहकार्य लाभले.