येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार करणार : महादेव जानकर

कुडाळ (अमोल गोसावी) : येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार करणार, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. माजी मंत्री महादेव जानकर आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त कुडाळमध्ये उपस्थित होते. मतदारसंघांमध्ये जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रा सुरू करण्यात येणार असून २९ ऑगस्ट रोजी पक्षाचा २० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली.

राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्रकारांनी विचारले असता जानकर म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ता कोणाची हेच समजत नाही. येत्या काळात विधानसभेत २० आमदार जिंकून येतील असा विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चमत्कार घडेल, असे महादेव जानकर म्हणाले. महाराष्ट्रातील जनता सत्य जाणते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पक्षांचे मनसुबे उधळले जातील असेही ते म्हणाले.

कोकणात पक्षाचे काम कमी
कोकणातील माणसे समंजस असून त्यामुळे येत्या काळात कोकणातही पक्षाचे काम वाढविणार आहे. कोकणात १५ दिवस किंवा आपण दौरा करणार आहोत. विदर्भ, मराठवाडा खानदेशात आपल्याला यश मिळाले आहे. पण कोकणात आपला पक्ष कमी आहे. आपल्या पक्षाला कोकणात येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, निवडणुकीत यश नक्कीच मिळेल असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

भाजप – सेनेकडून सापत्न वागणूक
मागील वेळी भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांसोबत आपली युती केली. पण आपल्याला सापतन वागणूक मिळाली, असा आरोपही महादेव जानकर यांनी केला आहे. मोठा मासा छोट्या माणसाला खातो ही भाजप आणि काँग्रेसची पॉलिसी आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रीय समाज पक्ष देशातही सक्रिय आहे. बेंगलोर, आसाम उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आमच्या पक्षाने यश मिळविले आहे. यापुढे सुद्धा पुढील निवडणुकीत आपण खासदार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये परभणी, माढा, मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथून खासदारकीची निवडणूक आपण लढवू शकतो असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर वरक, जिल्हा सरचिटणीस जाफर शेख, कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे, रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे, तानाजी गुरव, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश झोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!