धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील समुद्राला आलेल्या उधाणामुळे येथील किनारपट्टीची धूप झाली आहे. यामुळे किनारपट्टी लगत असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नव्याने करण्यात आलेल्या रस्ता देखील खचला आहे.तर याचं ठिकाणी असलेल्या माडाच्या झाडांना देखील किनारपट्टी खचल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे रमेश सनये यांच्या घरानजीक असलेल्या साई मंदिरालाही किनारपट्टीचा थोडाफार प्रमाणात तडाखा बसला आहे. या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने येथील किनारपट्टी भागातील लोकवस्तीला भविष्यात धोका निर्माण होण्याची संभावना नाकारता येत नाही. खचलेल्या किनारपट्टी ची शनिवार 5 ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी पाहणी करत येथील ग्रामस्थांची संवाद साधला. त्यावेळी मंजूर असलेला धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अद्याप का झाले नाही असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी याची सविस्तर माहिती घेऊन हा धूप प्रतिबंधक बंधारा लवकरात लवकर पूर्णत्वास जावा यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी येथील ग्रामस्थांना सांगितले. यावेळी शिवसेना देवगड विधानसभा संघटक संदेश पटेल, तालुकाप्रमुख अमोल लोके व सहकारी, तांबळडेग माजी सरपंच लवेश भाबल उपस्थित होते.













