अंमली पदार्थांची खरेदी, विक्री, साठा, वाहतुक आढळल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधा
प्रतिनिधी (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,अंमली पदार्थांच्या व्यसनापासून विद्यार्थी व युवकांना परावृत्त करण्यासाठी व्यापक जनजागृती करा, अशा सूचना करुन माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील मुले अंमली पदार्थ जवळ बाळगू नयेत, यासाठी शाळा, महाविद्यालयांनी महिन्यातून दोनदा अचानकपणे विद्यार्थ्यांची दफ्तर तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. यावेळी एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर, मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री.रेखावार म्हणाले, दप्तर तपासणी दरम्यान मुलांच्या दफ्तरात अंमली पदार्थ आढळून आल्यास त्यांचे समुपदेशन करा. मुलींच्या दफ्तरची तपासणी महिला शिक्षिकेकडूनच होईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती अगर समुह अंमली पदार्थाची खरेदी, विक्री, साठा अगर वाहतुक करताना, सेवन करताना किंवा अंमली पदार्थांचा बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी उपयोग करताना आढळून आल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधा. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्याबरोबरच बक्षीसही गोपनीयरित्या देण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले. शाळा, महाविद्यालये, बगीचा, सिनेमागृह, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, लॉजिंग, बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच खाजगी बसेस आदी ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री व देवाणघेवाण होवू नये यासाठी तपासणी करा. विद्यार्थी, युवकांबरोबरच त्यांच्या पालकांमध्येही जनजागृती करा. शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.अंमली पदार्थाविषयीच्या माहितीसाठी नागरिकांनी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे- 9420756782, पोलीस हवालदार महेश मनोहर गवळी – 8424007543, नियंत्रण कक्ष, कोल्हापूर- 0231-2662333 अथवा त्वरीत संपर्क नियंत्रण कक्ष, कोल्हापूर- 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी यावेळी केले.अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तीस शासनमान्य व्यसनमुक्ती केंद्रामध्ये शासनाच्या वतीने व्यसनमुक्त होण्याकरीता भरती करुन घेतले जात आहे. तसेच त्याने भविष्यात कधीही कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये यासाठी सामुहिक शपथ व त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रे- नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र, आर. के. नगर, कोल्हापूर व नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र, सांगाव रोड, कागल, कोल्हापूर याठिकाणी असल्याची माहिती श्री. वाघमोडे यांनी दिली.