सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क मिळावा आणि या जमिनीमध्ये अनधिकृतरीत्या करण्यात आलेले बांधकाम तोडण्यात यावे या मागणीसाठी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सखैलेखोल येथील शैलेश अर्जुन गोडकर याने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन केले.
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सखैलेखोल येथे आपली वडिलोपार्जित जमीन आहे. मात्र आपल्या वडिलांच्या मृत्यू नंतर या जमिनीतील नावे आपले काका यांच्या सांगण्यावरून संबधित तलाठी यांनी परस्पर रित्या संगनमताने कमी केली आहे. तसेच या जमिनीतील काही भाग विक्रीही केला असल्याचे शैलेश गोडकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान या वडिलोपार्जित जमीन मध्ये आपल्याला हक्क मिळावा यासाठी आपली आई अंजनी गोडकर आणि आपण स्वतः गेली १५ वर्षे पाठपुरावा करत आहोत.मात्र आपल्या मागणीची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. शिवाय जमीन विक्री केलेल्या जागेत बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे. याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र यावरही काही होत नाही.यासाठी आपण मंत्रालय पातळीवर ही न्याय मिळावा म्हणून लक्ष वेधले आहेत यापूर्वी अनेकवेळा आंदोलन करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क मिळावा आणि या जमिनीमध्ये अनधिकृतरीत्या करण्यात आलेले बांधकाम तोडण्यात यावे तसेच या प्रकरणी दोषी अधिकारी यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर करवाई व्हावी. या मागणीसाठी पुन्हा आज घंटा नाद आंदोलन जिल्हा परिषद समोर केले आहे याची प्रशासनाने दाखल घ्यावी.तसेच या प्रकरणी सर्व वारसांची एकत्रित सुनावणी घेऊन आपल्याला योग्य न्याय द्यावा . आजच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी पुन्हा आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा गोडकर यांनी प्रशासनास दिला आहे.













