खाजगी फायनान्स कंपनीच्या दंडेलशाही वसुली विरोधात भाजपा आक्रमक

कणकवलीत फायनान्स कंपनी कार्यलयाला दिली धडक

कणकवली ( प्रतिनिधी ) : खाजगी फायनान्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या कर्जाची वसूली दंडेलशाही ने केली जात असून कर्जदारांना घरी जाऊन धमकावणे, वसुली केलेल्या रक्कमेची कर्जदाराला पावती न देणे असे गैरप्रकार होत असल्याचा जाब विचारत भाजपा शिष्टमंडळाने कणकवली शहरातील त्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. या खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतल्यानंतर कर्जवसुली साठी घाट माथ्यावरील जिल्ह्यातील वसुली एजन्सी नेमण्यात आली आहे. या कर्जवसुली एजन्सी चे प्रतिनिधीकडून दादागिरीने कर्जवसूली केली जाते. वसुली च्या रक्कमेची पावतीही दिली जात नसल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी फायनान्स कम्पनी च्या मॅनेजर ला जाब विचारला. मात्र, कंपनीकडूनच एजन्सी नियुक्त केलेली आहे. त्यांच्याकडून वसूली केली जाते, असे मॅनेजरने सांगितले. मात्र, वसूलीच्या पद्धतीबाबतच्या आक्षेपाच्या बाबतीत संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधीला प्रत्यक्ष बोलावून चर्चा केली जाईल .6 सप्टेंबर रोजी कर्ज वसुली एजन्सी चे अधिकारी कणकवलीत येऊन चर्चा करतील असे फायनान्स कम्पनी च्या मॅनेजर जे सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक शिशीर परुळेकर, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगांवकर, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, विजय चिंदरकर आदी उपस्थित होते.कर्जाचा एखादा हप्ता थकबाकी असतानाही कर्जदाराचे वाहन वाटेत अडवून ताब्यात घेतले जाते. तसेच हत्याचे पैसेही घेतले जातात. त्याबाबत कोणतीही पावती दिली जात नाही.. यापुर्वी वनटाईम सेटलमेंट कोविड काळात होऊनही संबंधीत व्यक्तीच्या सीबील स्कोरला लोन कसे काय दिसते? असे सवाल भाजपा पदाधिकऱ्यांकडून करण्यात आले.
त्यावर वन टाईम सेटलमेंटबाबत आमच्याकडून पत्र दिलेले आहे. मात्र, सीबील स्कोरला अपडेट होण्यासाठी ४५ दिवस लागतात. आमच्याकडील कार्यवाही पुर्ण असल्याचे शाखा व्यवस्थापकाने सांगितले. तर थकीत हप्ता रत्नागिरीत भरून घेतला जातो, पण इथे का नकार देण्यात आला. याबाबत लेखी का दिले जात नाही, अशी विचारणा केली असता लेखी देण्यास हे शासकीय कार्यालय नाही, येथे लेखी कारभार चालत नसल्याचे उत्तर शाखा व्यवस्थापकाकडून देण्यात आले. तसेच नियुक्ती केलेल्या एजन्सीच्या माणसांनी जर वाहन ताब्यात घेतले तर ते ऑनलाईन पोलीस एन्ट्री करतात. तसेच नियमानुसार चार्ज घेतात, असे सांगण्यात आले. मात्र, नियुक्त केलेल्या एजन्सीची माणसे दादागिरी करत असल्याचे सांगत संबंधीत एजन्सीच्या प्रतिनिधीला बोलावण्याची मागणी करण्यात आली. मात्र, ही एजन्सी परजिल्ह्यातील असल्याने संबंधीत प्रतिनिधी महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात जिल्ह्यात असतात. आता ते येथे नाहीत, असे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले. त्यानंतर संबंधीत एजन्सी प्रतिनिधीला फोन केला असता त्यांनी सप्टेंबर महिन्यात 6 तारीखलाआल्यावर आपण चर्चा करतो, असे सांगितले. तसेच ही कार्यवाही नियमानुसार चालते व थकीत कर्जदारांना लोकअदालतीच्या नोटीसाठी पाठविण्यात आलेल्या असल्याचे शाखा व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!