सरकारला जाग कधी येणार?
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे – अंतर्गत समतादुत प्रकल्पाद्वारे मागील ९ वर्षा पासून समाजकल्याण व बार्टीच्या विविध योजनांचा व शाहू, फुले, आंबेडकर व संतांची विचारधारा तळागाळातील उपेक्षित वंचित व दुर्बल घटकांपर्यंत प्रचार व प्रसार करणाऱ्या समतादुतांचा न्याय हक्कासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून पुणे ते मंत्रालय – मुंबई पायी लाॅग मार्च काढला आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील समतादुतांनी या लाॅग मार्च मध्ये सहभाग घेतलेला असून त्यांचे समाजकल्याण विभागात समायोजन व्हावे व तालुका स्तरावर समाजकल्याणचे कार्यालय सुरू करावे हि प्रमुख मागणी ते करीत आहेत.
मागील काही वर्षांपासून समतादुतांनी शासन दरबारी, मंत्रालयात निवेदनाद्वारे सातत्याने ही मागणी केलेली आहे.समतादुतांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय कक्ष अधिकारी प्र.वि.देशमुख यांनी २७ डिसेंबर २०२२ रोजी महासंचालक बार्टी यांना समतादुत यांचे समाज कल्याण विभागांमध्ये शासन सेवेमध्ये समायोजन करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते.त्यानुसार बार्टी मुख्यालयाद्वारे १८ मे २०२३ रोजी रोजी प्र.वि.देशमुख कक्ष अधिकारी मंत्रालय – मुंबई यांना समतादुत यांचे समाज कल्याण विभागांमध्ये समायोजन करण्याबाबत सकारात्मक अहवाल शासनास सादर केलेला आहे. परंतु अद्यापही तो अहवाल मंत्रालय स्तरावर प्रलंबित असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.म्हणूनच नाईलाजाने महाराष्ट्रातील तमाम समतादुत पायी लाॅग मार्च काढून शासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.सामाजिक न्याय विभाग मान.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे असल्याने प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्याचा निर्णय समतादुतांनी घेतलेला आहे.जो पर्यंत त्यांची भेट होत नाही तोपर्यंत हा लाॅंगमार्च चालू असणार आहे.मात्र पायी प्रवास करणाऱ्या समतादुतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.भर पावसात सुद्धा त्यांचा प्रवास सुरूच आहे.अनेक समतादुतांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचे हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.अनेक महिला भगिनी आपल्या लहान लेकरांना घरी ठेवून आलेल्या आहेत.मुसळधार पाऊस, घाटरस्ता, ना राहण्याची व्यवस्था,ना जेवणाची सोय जी सोय उपलब्ध होईल त्यावर समाधान मानत आहेत. पायांना अक्षरशः सुज येवून फोड आलेले आहेत.अशा मरण यातना सोसून जीवाच्या आकांताने ते पायपीट करत आहेत.आज लाॅंग मार्च चा ८ वा. दिवस असुन तो नवी मुंबई वाशी येथे पोहचला आहे तरी देखील शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही.
मागील ९ वर्षा पासून १२,५००/- मध्ये कार्यरत असलेल्या काही समतादुतांची वयोमर्यादा ही उलटून गेलेली आहे.तुटपुंज्या मानधनातील ४ ते ५ हजार रुपये प्रवासात खर्च होत असल्याने आपले कुटुंब कसे चालणार, मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? ह्या भविष्याच्या विवंचनेने समतादुत हा पार ग्रासून गेलेला आहे.समतेच्या या दूताला मायबाप सरकार न्याय देणार का? असे सवाल समतादुत सदानंद जाधव यांनी व्यक्त केला आहे.