कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची टीका
कुडाळ ( अमोल गोसावी ) : तलाठी केंद्र दुसऱ्या टप्प्यात देखील बाहेरच्या जिल्ह्यात दिले गेले. मुख्य म्हणजे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार टीसीएस यांनी जिल्ह्यातील केंद्र देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एसएसपीएम या कॉलेजने तसेच एमआयटीएम कॉलेजने परीक्षेचे कारण देत परीक्षा केंद्र नाकारले. त्यामुळे केंद्रीय मंत्री राणेंना जिल्ह्यातील तरुणांची किती काळजी आहे किंवा ते किती काळजी घेतात हे विद्यार्थ्यांना लक्षात आले असेल. आम्ही खासदार, आमदार यांना विनंती केली होती की, केंद्र जिल्ह्यात देण्यासाठी प्रयत्न करा. त्यानुसार, टीसीएसने एसएसपीएम आणि एमआयटीएम या दोन्ही कॉलेजला संपर्क केला. दोन्ही कॉलेजने परीक्षेचे कारण देत तलाठी परीक्षा केंद्र नाकारली, अशी टीका युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनात आणले असते तर विद्यार्थ्यांचा त्रास कमी करू शकले असते. परंतु, त्यांनी ते केले नाही. त्यांचे ते वैयक्तिक कॉलेज असून त्यांनी त्या कॉलेजमध्ये काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी उपरोधिक टीकाही योगेश धुरी यांनी केली आहे. तर माजी आमदार राजन तेली यांनी फेकुगिरी कमी करावी, तेली यांचा फोन तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उचलला असेल का ? हा संशोधनाचा विषय आहे आणि उचलला असेल तर परीक्षा केंद्र का सुरू झाले नाही, असा टोला योगेश धुरी यांनी लगावला आहे.