संविता आश्रमात निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण
खारेपाटण (प्रतिनिधी): संदिप परब यांच्या संविता आश्रमद्वारे झाडांची लागवड, निगा राखणे याच बरोबरीने कुटुंबातील नाती सांभाळण्याच्या दृष्टीने शालेय वयातील पुढची पिढी जाणीवपुर्वक घडविण्यासाठी कौतुकास्पद कार्य सुरू आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब आँफ कुडाळचे प्रेसिडेंट दिनेश आजगावकर यांनी केले. जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात निबंध स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रमातील प्रमुण पाहुणे म्हणून ते बोलत होते. आजी आजोबांचे जीवनातील महत्व व प्लँस्टीक शाप की वरदान (१०वी), पर्यावराण संरक्षण काळाची गरज व वृध्दाश्रमःकाळाची गरज नसावी,(इ.९वी) स्वातंत्र्याची ७५ वर्षे व वाचाल तर वाचाल (८वी) ,ग्रंथ हेच गुरू व वृक्षाची आत्मकथा (७वी) , मानवता हाच खरा धर्म व प्रदुषणः एक समस्या (६वी),माझे आजी-आजोबा व माझं स्वच्छ गाव (५वी) या विषयांवरील इ.नुसार निबंध स्पर्धेचे आयोजन संविता आश्रमकडून करण्यात आले होते. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदिप परब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. संस्थेच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमांची माहिती देवून सद्यस्थीत कुटुंबातील नात्यांचे संस्कार , महत्व आणि एकमेकाला वेळ देणे कमी झाल्याचे सांगीतले. व संगणकीय काँपी पेस्टच्या जमान्यात आपल्या स्वतःच्या भावना स्वतःच्या शब्दांत विद्यार्थ्यांनी व्यक्त करणेही दुरापास्त झाल्याचे सांगून नव्या पिढिला जाणीव पुर्वक विचारशील व संस्कारीत करण्याची गरज असल्याचे म्हटले. बांदा हायस्कूलचे माजी शिक्षक शरद नाईक यांनी विद्यार्थ्यांना भक्त पुंडलिकाची गोष्ट सांगून आजी आजोबा व आई वडिलांची सेवा आणि शेजा-यांची सेवा ही परमेश्वर भक्तीएवढी मोठी असल्याचे म्हटले. पणदूर गावच्या सरपंच व प्रथम नागरिक पल्लवी पणदूरकर यांनी विद्यार्थ्यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. उपसरपंच साबाजी म्हस्के यांनी ” जीवनात आनंद घेता घेता जीवन कसे जगायचे ” हे संविता आश्रमात शिकवले जात असल्याचे म्हटले. कार्यक्रमात अणावचे रामेश्वर वाचनालय ग्रंथपाल सिताराम परब व पांग्रड हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रविण जाधव यांनी विचार मांडले. कार्यक्रमाआधी विद्यार्थ्यांना आश्रमात फिरवून त्यांना आश्रममधे सुरू असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमातील बांधवांचे जीवन समजून घेतले. बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात विजयी स्पर्धक कु.साक्षी गणेश सावंत आणि कु.दुर्वेश सुरेश सुतार या विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. यावेळी भडगाव, पांग्रड, आवळेगाव व दिगस हायस्कूलच्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि बक्षिस स्वरूपात वह्यांचे वितरण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत तामुलवृक्षचे रोपटे प्रदान करून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जीवन आनंदसंस्थेचे महाबळेश्वर कामत आणि किसन चौरे यांनी तर आभार प्रदर्शन आरती वायंगणकर यांनी केले. उषाताई आठले, काळप, भक्ती परब, विजया कांबळी व माधव पाटील यांची यावेळी उपस्थीती होती.













