विकास देसाई आणि समीक्षा शेलार पाचव्या आणि सातव्या स्थानावर
तळेरे (प्रतिनिधी): 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान जयपूर येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या श्रद्धा चोपडेने तब्बल 25 वर्षांच्या कालावधीनंतर राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले. 52 किलोखालील गटात मिळवलेले है पदक गोवा येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या नॅशनल गेम्सच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी आणि राज्यातील ज्यूदोपटूसाठी हे यश ऊर्जा देणारे आहे. आतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धामध्ये भारताला कास्यपदक मिळवून देणारी श्रद्धा या जयपूर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अत्यंत बहारदार खेळली. सीआरपीएफच्या समता राणे हिच्या बरोबर झालेल्या प्रथम फेरीत श्रद्धा वाझाओरी या गुणाने विजयी झाली. हरयाणाच्या दिव्यांशी हिला सिआई नागे डावाच्या आक्रमणाने दुसऱ्या तर तिसऱ्या फेरीत एसएसबीच्या एन. सारदा देवी हिला मॅटवर जखडून ठेवत इप्पोन हा पूर्ण गुण घेऊन या दोघीना श्रद्धाने पराभूत केले. मध्यप्रदेशच्या सध्या तिवारीसह झालेल्या लढतीत श्रद्धाने पुन्हा अर्धा गुण घेऊन विजय संपादन केला. अंतिम सुवर्ण पदकासाठीच्या लढतीत दिल्लीच्या तनीश्ता टोकस हिच्या बरोबर तब्बल 15 मिनिट चाललेल्या गोल्डन स्कोअरमधील या सामन्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करत श्रद्धाने केसागातामै दावाचा वापर करून टोकस हिला पराभूत केले आणि एक ऐतिहासिक विजय नोंदवला. श्रध्दाने आपल्या अष्टपैलु कामगिरीने महाराष्ट्र राज्याच्या प्रदीर्घ कालावधीची सुवर्ण पदकाची तृष्णा पूर्ण केली. 48 किलोखालील गटात खेळणाऱ्या नाशिकच्या आकाक्षा शिंदे हिने पहिल्या तीनही लढली ईप्पोन या पूर्ण गुणांनी जिंकल्या. या सर्व लढतीत तिचा आवेश उल्लेखनीय होता. या लढती तिने बलाढ्य पंजाब, एसएसबी यासह जम्मू काश्मीर यांच्याबरोबर खेळल्या. उपउपांत्य फेरीत राजस्थानाच्या मोनिका चौधरी हिच्याबरोबर मात्र तिला हार पत्करावी लागल्याने आकाक्षाला अंतिम फेरीत जाता आलं नाही, मात्र कास्यदकाच्या सामन्यासाठी पश्चिम बंगालच्या पायल सेनगुप्ता हिच्या बरोबर आकांक्षाला खेळावे लागले. या संधीचे सोने करत आकाक्षाने सामना कालावधी संपायच्या आतच तीव्र आक्रमण करत पायलला पराभूत केले आणि कांस्यपदक पटकावले.
तर ठाण्याची आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू अपूर्वा पाटील हिने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या फेरीतील सिआरपीएफ या मजबूत संघाची उमा चव्हाण हिला कोशी गुरुमा हा डाव करून इम्पॉन गुणाने चितपट केले. त्यानंतर शांभवीलाही तिने हराई गोशी डावाने हरवले मात्र, उप उपांत्य फेरीत जागतिक स्पर्धेतील विजेती खेळाडू तूलिका मान हिच्या सोबत अपूर्वाला हार पत्करावी लागल्याने कास्य पदकाच्या सामन्यासाठी ती पात्र ठरली. हिमाचल प्रदेशच्या निर्जला हिला या फेरीत पूर्ण गुण घेऊन सहज पराभूत केले आणि अपूर्वाने कास्य पदकावर आपले नाव कोरले.
गेले एक तप राज्यात अजिंक्य राहिलेल्या 90 किलोखालील गटाचा पुण्याच्या विकास देसाई याने आपल्या अनुभवाच्या जोरावर अत्यंत बहारदार खेळी केली. त्याचे पहिले दोन फेरीतील स्पर्धक आयटीबिपीचा नवज्योत चन्ना आणि एसएसबीचा रजनिश हे दोघेही उत्कृष्ठ आणि नामवंत खेळाडू होते पण या दोघानाही विकासने हरवून दमदार सुरुवात केली. पण तिसऱ्या सामन्यात दिल्लीच्या दीपक देशवालसह झालेल्या लढतीत त्याला हार पत्करावी लागली. त्यांतर झालेल्या पंजाबच्या जगतार सिंगला त्याने हरवून पाचव्या फेरीत प्रवेश केला खरा, पण कांस्यपदकाच्या या सामन्यात विकासने केलेल्या आक्रमणाला पंचानी प्रतिसाद न दिल्याने नाउमेद झालेल्या विकासला सीआयएफच्या सागरने पराभूत केले. यामुळे विकास देसाई पाचव्या स्थानावर राहिला पण त्याची गोवा येथील नॅशनल गेम्समधील सहभागासाठी पात्रता झाली. याच पद्धतीने कीडा प्रबोधिनीच्या समीक्षा शेलार हिच्या सातव्या स्थानामुळे तिचीही नॅशनल गेम्समधील सहभागासाठी पात्रता झाली.
भोपाळ येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात श्रद्धा चौपडे आणि अपूर्वा पाटील या दोघी सध्या सराव करत असून आकाक्षा शिंदे ही बेल्लारीच्या जेएसडब्ल्यु अकादमीत सराव करते. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी येथील समीक्षा शेलार ही खेळाडू असून विकास देसाई हा पुणे जिल्हा ज्यूदो संघटनेचा खेळाडू आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या मधुश्री देसाई या मुलींच्या तर नागपूरचा साईप्रसाद काळे हे मुलाच्या राज्य संघ प्रशिक्षकपदी नेमले गेले होते. या यशस्वी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडुंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले आणि महासचिव शैलेश टिळक यासह कार्यकारिणी समितीने विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे. राज्याला मिळालेल्या या यशामुळे गोवा येथील नॅशनल गेम्सच्या मिक्स्ड टिम स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धेतील गुणानुक्रमे पहिले आठ संघ सहभागासाठी पात्र असतात. महाराष्ट्र संघ या जयपूर राष्ट्रीय स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिल्याने ही पात्रता राज्याच्या ज्यूदों संघाने पूर्ण केली असून ते आता गोवा नॅशनल गेम्सध्ये सहभागी होतील.