‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत सर्वेक्षण व परीक्षणासाठी आलेल्या पथकास सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचा खडा सवाल…..!
तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे बसस्थानकात सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. मात्र याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दक्षतापूर्वक योग्य ती उपाययोजना केलेली नाही. अशा परिस्थितीत ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ या अभियांनातर्गत नेमण्यात आलेल्या पथकाने काल तळेरे बसस्थानक परिसराचे सर्वेक्षण व परीक्षण केले. यावेळी सदर पथकाची सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी भेट घेऊन त्यांना तळेरे बसस्थानक परिसरातील विविध समस्यांची योग्य ती कल्पना दिली. तसेच त्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत दक्षतापूर्वक योग्य ती उपाययोजना केली जात नसल्याचे स्पष्ट निदर्शनास आणून देत तळेरे बसस्थानक परिसरात स्वछताच नाही, तर सुंदरता कोठून येणार? असा खडा सवाल उपस्थित केला.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गानजिक असलेले तळेरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख बसस्थानक आहे. स्थानिक ग्रामीण भागांसह मुंबई, गोवा, देवगड, विजयदुर्ग, कोल्हापूर, पुणे इ. दूरवरच्या मार्गांवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक एस.टी.बस दर दिवशी तळेरे बसस्थानकात दाखल होतात. तसेच त्यामुळे दर दिवशी शेकडो प्रवासी देखील या बसस्थानकात दाखल होतात. परंतु या बसस्थानकात प्रवासी वर्गासाठी आवश्यक अशा मूलभूत सोई-सुविधा उपलब्ध नाहीत. तळेरे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळ – कचऱ्याचे साम्राज्य आहे, स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत, पुरेशा कचराकुंड्या व सफाई कर्मचारी उपलब्ध व कार्यरत नाहीत, सार्वजनिक स्वछताविषयक जनजागृतीपर ठळक असे फलक आवश्यक त्या दर्शनी भागात लावलेले नाहीत, तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उपलब्ध व कार्यान्वित नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व हिरकणी कशाची मोफत सोय-सुविधा उपलब्ध नाही. यामुळे सार्वजनिक असुविधा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे बसस्थानक इमारत व त्यालगत असलेली पाण्याची टाकी नादुरुस्त अवस्थेत आहे. परिसर कुंपण मोडकळीस आलेले आहे, विहिरीवर लोखंडी आच्छादन नाही, अग्निशामक यंत्रणा उपलब्ध व कार्यान्वित नाही, सी. सी. टी. व्ही. कॅमेरा यंत्रणा उपलब्ध व कार्यान्वित नाही. यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत तळेरे बसस्थानक परिसरातील समस्या जाणून घेऊन त्यांचे योग्य ते निवारण करण्यासाठी मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दक्षतापूर्वक योग्य ती उपाययोजना केलेली नाही.
एकंदरीत लोकहितास्तव असलेल्या या सर्व बाबी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानातंर्गत सर्वेक्षण व परीक्षणासाठी नेमण्यात आलेल्या पथकास निदर्शनास आणून देताच त्यांनी त्याबाबत योग्य ती कल्पना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित विभागीय नियंत्रकांस देण्यात येईल असे राजेश जाधव यांना आश्वासीत केले आहे. तथापि येत्या काळात तळेरे बसस्थानक परिसरातील सर्व समस्यांचे वेळीच निवारण होणेसाठी आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे व त्याची योग्य ती दखल न घेतली गेल्यास संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याची भूमिका राजेश जाधव यांनी घेतली आहे.