कै. मानाजीराव गुरव यांच्या अर्धकृती पुतळ्याचे आखवणे येथे अनावरण
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्याच्या जडणघडीत वैभववाडी तालुक्याचे पहीले सभापती मानाजीराव गुरव अर्थात आबा यांचे अतिशय मोठे योगदान आहे. एक तत्वनिष्ठ , निस्वार्थी, परखड व अभ्यासु व्यक्तिमत्वामुळे आबांच्या व्यक्तीमत्वाची वेगळी छाप कोल्हापूर व नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पडली आहे. त्यांच्या राजकारणाचा आर्दश आजच्या पिढीने घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी केले. आखवणे गुरववाडी येथे कै.मानाजीराव गुरव यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण विधीवतपणे मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रावराणे आंबाच्या जीवनचरिञावर बोलत होते. माजी सभापती बाप्पी मांजरेकर, जेष्ठनेते सज्जन काका रावराणे, वैभववाडी उपनगराध्य संजय सावंत, आखवणे भोम सरपंच आर्या कांबळे, गुरव संघटनेचे सुरेश गुरव, तानाजी गुरव, शिक्षक संघटनेचे शरद नारकर, महेश संसारे, शरद कांबळे , मांगवली हायस्कूल मुख्याध्यापक शिवाजी पाटील, डाॕ.जगन्नाथ जामदार, अशोक बांद्रे, अंकुश नागप, तंटामूक्त समिती अध्यक्ष विकास जामदार, पोलिस पाटील संतोष गुरव, माजी उपसरपंच शांतीनाथ गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने आखवणे भोम, मौंदे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावराणे पुढे म्हणाले, आंबानी आपले संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी वेचले आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी काहीही केले नाही. राजकारणातील तपस्वी व्यक्तीमत्व म्हणून आबांकडे पाहीले जाते. त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावामुळे त्यांना सह्याद्रीचा वाघ म्हणून संबोधले जात होते. आबांचा प्रशासनावर जबरदस्त वचक असे. सभागृहात एकादा विषय घेतला तर त्याची अभ्यासपूर्ण मांडणी करीत. तो विषय तडीस जात नाही तोपर्यंत आबा स्वस्थ बसत नव्हते. त्याच्या शिकवणीतून व आशिर्वादामुळेच आपण राजकारणात यशस्वी झालो असे रावराणे म्हणाले. यावेळी बोलताना माजी सभापती बाप्पी मांजरेकर म्हणाले, आंबाची राजकीय कारकिर्द आम्ही जवळून पाहीली. सर्वसामान्य माणसांसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून आबांची ओळख होती. अन्याया विरोधात कोणाची भाडभिड न ठेवता उभे राहात असत. तालूक्याचा व या विभागाच्या विकासात आंबाचा सिंहाचा वाटा असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.
तर आबांचे दुसरे सहकारी सज्जनकाक रावराणे यांनी आंबाच्या आठवणींना उजाळा देताना आपण आंबासोबत नेहमीच खंबीरपणे उभे राहीलो. असे सांगितले. यावेळी संजय सावंत, महेश संसारे, आर्या कांबळे, श्री. भोसले, सुरेश गुरव, तानाजी गुरव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.