यंदा शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच

मुंबई महापालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी

ब्युरो न्युज ( मुंबई ) : यंदाही शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद अखेर मिटला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवागनी मिळाली आहे. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवतीर्थवर होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर आज महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी आपली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे दिली. “हा नैतिकतेचा विजय आहे. महापालिकेने यापूर्वीच विचार करुन याआधीच परवानगी द्यायला हवी होती. पण उशिरा का असेना पण मनपाने शहाणपण दाखवलं. परवानगीमध्ये जो तांत्रिक भाग होता, त्यानुसार अर्जदाराचा पत्ता सेनाभवनाचा होता. सेनाभवनातूनच आपण पत्रव्यवहार करतो. तो आम्ही यापूर्वीच केला होता. गेल्या वर्षीही कोर्टाने आम्हाला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शिस्तप्रिय शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा होईल”, असं सचिन अहिर म्हणाले.

मंत्री दीपक केसरकरांनी शिंदे गट शिवाजी पार्क नाहीतर क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर दसरा मेळावा घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेत शिवाजी पार्कसाठी केलेला अर्जही शिंदे गटानं मागे घेतला होता. शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्यानंतर ठाकरेंचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर आज महापालिकेनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा निर्णय निकाली काढला. महापालिकेकडून ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!