मूकबधिर वेडसर युवतीवर बलात्कार करणाऱ्या मंगेश परब ला आर्थिक दंडासह 10 वर्षे सक्तमजुरी ची शिक्षा

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी कौशल्याने केला यशस्वी युक्तिवाद

महिला उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्या यशस्वी तपासाला आले फळ

परप्रांतीय पीडित मूकबधिर युवतीला साक्षीसाठी कोर्टात आणण्यात हवालदार प्रमोद काळसेकर यांनी केले सहकार्य

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मूकबधिर वेडसर युवतीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी मंगेश दशरथ परब (कासले )रा हुमरमळा याला दंडासह दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.संजय भारुका यांनी सुनावली.सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी अत्यंत यशस्वी युक्तिवाद करून आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध केला. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील पीडित युवती ही मराठी अभाषिक आणि मूकबधिर असूनही तिची साक्ष मोठे कसब लावून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी न्यायाधीशांसमोर मांडली. आरोपी मंगेश परब याने रस्त्यावर फिरस्ती असलेली मूकबधिर युवती ओरोस गरुड सर्कल येथील बस स्टॉप मध्ये बसलेली असताना तिला उचलून बस स्टॉप च्या मागे घेऊन गेला.नंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला होता. ही घटना 1 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. ही घटना घडताना गरुड सर्कल बस स्टॉपनजीक च्या इमारतीत रंगकाम करणाऱ्या युवकांपैकी आदित्य अरुण म्हसकर याने पाहिली होती.याबाबत आदित्य ने ओरोस पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पीडित युवती आणि आरोपीला पोलीस ठाण्यात आणले होते. आदित्य म्हसकर ने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मंगेश परब वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची संपूर्ण सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.संजय भारुका यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आठ साक्षीदार तपासले. सदर खटल्यात मूकबधिर साक्षीदाराचा पुरावा गजानन तोडकरी यांनी कौशल्याने रेकॉर्डवर आणलेला होता. व वरिष्ठ न्यायालयाचे न्याय निवाडे देऊन युक्तीवाद केला होता. आज न्यायालयाने आरोपी मंगेश परब याला दोषी धरून भा द वि कलम 376(1), अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास व 1000/- दंड व कलम 376(2)(L) अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास व 1000/- दंड अशी शिक्षा सुनावली.सदर गुन्ह्याचा तपास तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल पाटील यांनी केला होता. सदर केसच्या सुनावणीवेळी साक्षीदारांना उपस्थित ठेवण्याकरता तसेच तेलंगणा राज्यातून पिडीतेला आणण्याकरिता पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर व सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील वगैरे टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!