लाचखोर निलंबित पीएसआय सूरज पाटील चा अटकपूर्व जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

निलंबित पीएसआय सूरज पाटीलवर अटकेची टांगती तलवार

ओरोस (प्रतिनिधी): फ्लॅट खरेदी फसवणूक प्रकरणात बिल्डर सिद्धांत परब याच्याकडून गुन्ह्याच्या तपासकामासाठी सहकार्य करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यातील सावंतवाडी पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय सूरज पाटील चा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी आज फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी याकामी यशस्वी युक्तिवाद केला. हा गुन्हा 12 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात घडल्यानंतर यातील दुसरा आरोपी पीएसआय सूरज पाटील हा प्रकृती अस्वास्था चे कारण दाखवून वैद्यकीय उपचार घेत स्वतःची अटक टाळण्याचे प्रयत्न करत होता. एसीबी ला शरण न जाता निलंबित लाचखोर पीएसआय सूरज पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. पीएसआय पाटीलच्या अटकपूर्व जामीन अर्जाला जोरदार हरकत घेत सरकारी वकील देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपी लोकसेवक सूरज पाटील हा गुन्हा घडल्यापासून नजरेआड असून त्याच्याकडे या गुन्ह्याचा सविस्तर तपास करता आलेला नाही, आरोपी सूरज पाटील च्या आवाजाचा नमुना घेणे बाकी आहे, सदर कारवाई बाबत आरोपी पाटीलकडे या गुन्ह्यात अन्य कोणत्या लोकसेवक अधिकारी अथवा कर्मचाऱ्याचा सहभाग आहे काय याबाबत तपास करायचा आहे. सरकारी वकील देसाई यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी निलंबित लाचखोर पीएसआय सूरज पाटील चा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे आता अटकपूर्व जामिनासाठी सूरज पाटील याला हायकोर्टात धाव घ्यावी लागेल किंवा एसीबी ला शरण जावे लागेल.

error: Content is protected !!