तळेरे ( प्रतिनिधी ) तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे वंशज तथा महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे सचिव शैलैश टिळक, इतर महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी महाविद्यालय व तळेरे गावाच्यावतीने या मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी शैलेश टिळक यांनी महाविद्यालयाच्या कामाचे विशेष कौतुक केले व उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षकवर्गाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या कॉलेजमधील एका स्पर्धेचे उद्घाटन शैलेश टिळक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिश बंगेरा, खजिनदार रवींद्र मेतकर,राज्य पदाधिकारी ॲड.विकास पाटील, राज्य ज्युदो कोच आशिष लोकरे, तसेच तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, कासार्डे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, उपाध्यक्ष अभिजित शेट्ये, ज्युदो कोच सोनू जाधव व दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक आदी मान्यवर तसेच कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होता.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात,कासार्डे ता.कणकवली येथे१९९७ पासून मोफत सुरू असलेल्या ज्यूदो प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या ज्यूदो क्लबचीही माहिती घेऊन सर्व तालुक्यांत ज्युदो प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची सुचना केली. याठिकाणी कासार्डे विद्यालयच्यावतीने प्राचार्य एम.डी.खाड्ये यांनी स्वागत केले. दळवी कॉलेजचे प्रा.प्रशांत हटकर व इतर प्राध्यापक वर्गानी या राज्य पदाधिकारी यांना मुंबई विद्यापीठ अंतर्गत सूरू असलेल्या विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.