कवी सिद्धार्थ तांबे यांच्या सुर्योन्मुख शतकाच्या दिशेने काव्यसंग्रहास राज्यस्तरीय “उत्तम-सर्वोत्तम” पुरस्कार जाहीर

सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग संस्थेने पुरस्काराची केली घोषणा

कणकवली (प्रतिनिधी) : सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेच्या ‘उत्तम-सर्वोत्तम, राज्यस्तरीय काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून हा पुरस्कार प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

परिवर्तनशील व कृतिशीलता जपणारा सामाजिक कार्यकर्ता, कवी उत्तम पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘उत्तम सर्वोत्तम’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ एका सर्वोत्तम काव्यसंग्रहाला दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार ‘आबूट घेर्‍यातील सूर्य’ (अरूण इंगवले), मी रांगेतच उभा आहे (भूषण रामटेके), अर्धे आकाश माथ्यावर (डाॅ. श्रीधर पवार) या कवितासंग्रहांना प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराचे स्वरूप ₹ ५०००/- , शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

सम्यक साहित्य संसद ही मराठी वाङमयीन क्षेत्रात अग्रेसर असून या संस्थेतर्फे आ. सो. शेवरे जीवनगौरव व उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. मराठी वाङमय क्षेत्रातील उत्कृष्ट काव्यसंग्रहाची निवड करून, काव्यसंग्रह व कवीचा सन्मान करीत आहेत. वर्ष २०२३ या वर्षी हेतकर्स पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या, कवी सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाची निवड केली आहे. प्रा. सिद्धार्थ तांबे हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, शिवडाव (त‍ा. कणकवली) य‍ा गावचे सुपुत्र असून ते आरोंदा हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. साहित्य, संगीत, कला, बौद्ध वाड्.मय,वक्तृत्व अशा विविधांगी विषयांची आवड असल्याने त्यांना विद्यार्थी घडविण्याचे कार्य करताना निश्चितच फायदा झाला. प्रा. सिद्धार्थ तांबे यांचा पिंड कार्यकर्त्याचा असून विविध चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध आहे. छात्रभारती व दर्पण सांस्कृतिक मंचाद्वारे त्यांनी तत्कालिक प्रश्नांवर अनेक आंदोलने, मोर्चा, लढ्यात व साहित्यिक उपक्रमात सहभाग व कार्य केले. धम्मशिबीर, प्रवचन श्रुंखला, चर्चासत्र, परिसंवाद, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजाभिमुख कार्य केले. आ. सो. शेवरे यांच्या नेतृत्वाखाली साहित्य व साहित्यिक घडविण्याच्या मिशन कार्यात सहभागी होताना कवीसंमेलने, चर्चासत्र, साहित्यिक मेळावे, साहित्य संमेलनांत सक्रीय सहभाग दर्शविला. प्रसंवादच्या वार्षिकांकाच्या निर्मीतीतही कवी सिद्धार्थ तांबे यांचा सक्रिय सहभाग आहे.

‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ हा कवितासंग्रह अल्पावधीतच वाचकांच्या पसंदीला उतरला असून या काव्यसंग्रहाने महाराष्ट्राच्या वाङमयीन क्षेत्रात आपली अमीट नाममुद्रा उमटविली आहे. त्यांना, वामनराव गंगाधर रुपवते ट्रस्टचा ‘महाकवी अश्वघोष राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’, विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशनचा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ व भीमाई ट्रस्टचा ‘ महामाता रमाई काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सूर्यकुलातील लोकांनी सूर्योन्मुख दिशेने वाटचाल केली तरच मुलत: वैश्विक असलेली आंबेडकरी कविता अधिक व्यापकपणे जागतिक स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करू शकते हा निर्वाळा कवी सिद्धार्थ तांबे यांच्या सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने या कवितासंग्रहात अनुभवास येतो. सिद्धार्थ तांबे यांची कविता सनातन व्यवस्थेला छेद देत असून ती ग्लोबल आहे. या कवितेने समिष्ठीची, सर्वहारा समाजाची भाषा अवगत केली अाहे. आंबेडकरी कवी हा वंचित, उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी, नवसमाज निर्मितीसाठी दिशादिग्दर्शन करण्याचं मौलिक कार्य करीत असतो. कवी सिद्धार्थ तांबे यांची कविताही याला अपवाद नसून ती कालातीत असून ती बुद्ध, फुले-आंबेडकरी विचारधारेची कास धरते. कौटुंबिक, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीत आलेले दाहक अनुभव व समाजातील वास्तव या कवितासंग्रहातून प्रत्ययास येते. सम्यक साहित्य संसदने, प्रसिद्ध झालेल्या बर्‍याच कवितासंग्रहाचा धांडोळा घेऊन त्या कवितासंग्रहातून ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या कवितासंग्रहाची ‘उत्तम सर्वोत्तम’ या राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाईल, अशी माहिती सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष इंजि. अनिल जाधव व कार्यवाह राजेश कदम यांनी दिली.

error: Content is protected !!