जिल्ह्यातील सर्वच आरोग्य रुग्णालयाकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ! – सतीश सावंत

रुग्णांना ग्रामीण प्रा. आ.केंद्र- उपकेंद्रात सुसज्ज आरोग्यसेवा मिळावी ; सुशांत नाईक.

महिला-बालकांना प्रा. आ.केंद्रात योग्य औषधोपचार मिळावा ; नीलम पालव.

फोंडाघाट प्रा.आ.केंद्रात लाक्षणिक धरणे आंदोलन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : उन्मळून पडलेल्या सिंधुदुर्गातील सर्वच यंत्रणा, सध्या मोदींच्या आगमनासाठी कामाला लागल्या आहेत.त्यातही आरोग्य विभाग व्हेंटिलेटर वर असून फोंडाघाट प्रा. केंद्राची दुरावस्था गंभीर आहे. इथे केस पेपर काढून रुग्णांचे पार्सल कणकवली-ओरस येथे पाठवण्याचे काम केले जाते.इमारत, डिलिव्हरी रूम मोडकळीस आले आहेत. नर्स- फार्मासिस्ट स्टाफ ची कमतरता आहे. सरकारच्या या दुर्लक्षाबद्दल रुग्ण आणि जनतेमध्ये कमालीचा संताप आहे. त्यामुळे रुग्णांना हक्काची आरोग्य सुविधा मिळावी, याकरिता लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलन होत आहे. असे परखड विचार जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी काढले.

फोंडाघाट प्रा.आ.केंद्रातील असुविधा कमी स्टाफ औषधांची कमतरता रुग्णांची हेळसांड.या प्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माधवी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आ. केंद्र फोंडाघाट येथे शिवसेना (उबाठा) तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुशांत नाईक, राजू राणे,शैलेश भोगले, नीलम पालव, वैदेही गुडेकर, संजना कोलते, रवींद्र पाटकर, माधवी दळवी, प्रतिभा अवसरे, विलास गुडेकर, रवींद्र पाटकर, सुरेश टक्के, अनिल पटेल, प्रथमेश उरणकर, भाई हळदिवे, विजय जामदार, सतीश मेस्त्री, भाई सावंत- पटेल, दिव्या साळगावकर, पूजा राजू साटम, इत्यादी मान्यवरांसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शिवसैनिक पुरुष- महिला उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवा अध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, आज संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय आरोग्य विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सरकारला जाग येऊन रुग्णांना कायमस्वरूपी योग्य आरोग्यसेवा मिळावी, यासाठी हे आंदोलन आहे.इथे केंद्रामध्ये ओपीडी १०० च्या वर असून महिला- बालके यांची संख्या जास्त असते. महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव म्हणाल्या, ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्या साठी माननीय उद्धवजींनी प्रयत्न केले. मात्र या सरकार च्या राज्यात प्रा.आ. केंद्र येथे येणाऱ्या महिला बालकांना अत्यावश्यक सेवा मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.याची जाणीव सरकारला होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील महत्त्वाच्या फोंडाघाट प्रा.आ. केंद्र सुसज्ज व्हावे, यासाठी या हा प्रयत्न आहे.

दुपारी उशिरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पूजा काळगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, आंदोलन मागे घेण्यासाठी लेखी आवाहन केले. त्यांचे सोबत आरोग्य विकास अधिकारी ठाकूर, फोंडा प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तपते, डॉ. दीप्ती सूर्यवंशी,डॉ. गणेश यादव आणि कर्मचारी स्टाफ उपस्थित होता. माहिती वजा निवेदनामध्ये प्राथमिक केंद्रामधील ९ रिक्त पदा बद्दल जिल्हास्तरावर जाहिरात निघाली असून, दोन महिन्यात ती भरण्यात येतील.तोपर्यंत त्या पदाचा कार्यभार लगतच्या प्रा.आ. केंद्राकडे देण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव राज्यस्तरावर सादर करण्यात येईल. जीवनावश्यक औषधे-इंजेक्शन- लसीचा पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध असून, जो साठा जिल्हा स्तरावरून येत नाही तो स्थानिक निधीतून खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या निकषानुसार जरूर ती यंत्रसामग्री उपलब्ध आहे असे कळविले आहे.

या निवेदनाला दोन महिन्याची मुदत देऊन धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.मात्र दोन महिन्यात सर्व बाबींची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला…

error: Content is protected !!