टिल्ल्या आमदाराच्या लाडापायी आरोग्यसेवेचा खेळखंडोबा

पालकमंत्रीसाहेब कणकवली विधानसभा क्षेत्राचे पालकत्व तुमच्याकडे नाही काय ?

शिवसेना नेते अतुल रावराणेंचा खोचक सवाल

वैभववाडी : टिल्ल्याआमदाराच्या लाडापायी कणकवली विधानसभा क्षेत्रातील आरोग्ययंत्रणेचा खेळखंडोबा झाला असून कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राची करोडो रुपये खर्चून बांधलेली नूतन इमारत विनावापर पडून आहे.तर वैभववाडी पंचायत समिती च्या नूतन इमारतीचे बांधकाम होऊन 5 वर्षे उलटली तरी तिचे अद्याप उदघाटन होऊ शकलेले नाही. पालकमंत्री साहेब कणकवली विधानसभा क्षेत्राचे पालकत्व तुमच्याकडे नाही काय ? असा खोचक सवाल सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला आहे. अतुल रावराणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना रोखठोक सवाल करताना म्हटले आहे की भाजपात तुम्ही आयात केलेल्या टिल्ल्या आमदाराचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील आरोग्यसेवेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. वैभववाडी कणकवली देवगड या तिन्ही तालुक्यात वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल व प्रशासकीय स्टाफ अपुरा आहे. त्याचा परिणाम जनतेच्या आरोग्यसेवेवर होतोय. टिल्ल्या आमदार कमिशन मिळवून केवळ मलई लाटण्यात मग्न आहे. वैभववाडी पंचायत समिती पूर्ण होऊनही इमारत 5 वर्षे धूळ खात उभी आहे.लोकार्पण न झालेल्या या इमारतीवर दुरुस्ती खर्च करण्याची वेळ केवळ स्थानिक आमदाराच्या श्रेय घेण्याच्या वृत्तीमुळे आली आहे. वैभववाडी पं स च्या इमारतीचे लोकार्पण महिन्याभरात करू असे आपण आश्वासन दिले होते, मात्र तीन महिने उलटूनही अद्याप वैभववाडी पं स ची ही इमारत तशीच धूळ खात उभी आहे. नॅशनल हायवेवर असणाऱ्या कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभारणीला शासनाचा कोटी हुन अधिक निधी खर्च झाला.ती इमारतही अद्याप विनावापर पडून आहे. पालकमंत्री म्हणून आपण जिल्हा रुग्णालय बाबत अलीकडेच आढावा बैठक घेतली.जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. पण पालकमंत्री साहेब आपण कणकवली विधानसभा क्षेत्रातील आरोग्य व अन्य समस्यांकडे कधी लक्ष देणार आहात ? की टिल्ल्या आमदाराच्या हट्ट आणि लाडापोटी आपण कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणार आहात ? असा कडवा सवाल अतुल रावराणे यांनी उपस्थित केला आहे.

error: Content is protected !!