माझी शाळा हेच माझे कुटुंब हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून पाताडे उभयतांचे शैक्षणिक कार्य
आदर्श शिक्षीका सिद्धी पाताडे यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील सेवेमध्ये रुजू झाल्यापासून अविरतपणे ३४ वर्षे ०२ महिने ०९ दिवस शैक्षणिक ज्ञानदानाचे कार्य केलेल्या सन -२०११/१२, जि.प.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षीका सिद्धी पाताडे यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ काल त्यांच्या श्री.गांगेश्वर विद्या मंदिर नापणे नं-१ शाळेत संपन्न झाला. तबला व हार्मोनियम वादन या आपल्या आवड व छंदातून वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला क्रीडा व संगीत क्षेत्राची खऱ्या अर्थाने ओळख करुन देत सतत जिल्हा स्तरावरील ज्ञानी मी होणार यांसारख्या स्पर्धांमध्ये वैभववाडी तालुक्याचे वर्चस्व कायम अबाधित ठेवण्यासाठी पाताडे उभयतांनी केलेले शैक्षणिक कार्य मोलाचे आहे असे प्रतिपादन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व मा.जि.प.सभापती जयेंद्र रावराणे यांनी केले ते बोलताना म्हणाले माझी शाळा हेच माझे कुटुंब हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून पाताडे उभयतांनी आज पर्यंत शिक्षणक्षेत्रात ज्ञानदाना बरोबरच अनेक यशस्वी शैक्षणिक उपक्रम राबविलेले शालेय परिसरात पहावयास मिळतात. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील सेवेचा हा एक टप्पा पुर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती म्हणजे जणू त्याच्या आयुष्यातील दुसऱ्या नव्या आयुष्याची एक प्रकारे सुरुवात आहे. पाताडे मॅडम यांच्या शैक्षणिक सेवेतील संगीत क्षेत्रातील कार्य पाहता सप्तसुरांप्रमाणे यांचे पुढील आयुष्य बहरत राहून निरोगी व आनंददायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.सभापती तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मा.सभापती बाप्पी मांजरेकर, गट शिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, शिक्षक नेते व शासकीय निमशासकीय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद नारकर , मा.जि.प.सदस्य सुधीर नकाशे, नापणे सरपंच प्रदीप जैतापकर, नाधवडे सरपंच शैलजा पांचाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान यादव, नाधवडे ब्राह्मणदेववाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ कोकाटे, केंद्रप्रमुख गौतम तांबे , विश्वनाथ चव्हाण, संजय पाताडे , सुधिर गोसावी , स्वप्नगंधा चव्हाण .विजय केळकर आदी मान्यवर,शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













