शर्मिला नारायण तिरोडकर या ६५ वर्षिय निराधार महिलेचे संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : मु.पो.डिंगणे (गावडणवाडी) ता.सावंतवाडी येथून शर्मिला नारायण तिरोडकर वय वर्षेः ६५ या निराधार व बेघर महिलेला बांदा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून दि.१६ नोव्हेंबर,२३ रोजी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल करण्यात आले होते. शर्मिला तिरोडकर या डिंगणे येथे निराधार स्थीतीत राहत होत्या. त्यांची देखभाल करण्यासाठी कोणी नसल्याने डिंगणे गावातील पोलिस पाटिल यांनी याबाबत बांदा पोलिस स्टेशनला खबर दिली असता पोलिसांनी महिलेची सविस्तर चौकशी केली.आणि जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचेशी संपर्क करून महिलेला आश्रय आणि उपचारासाठी संविता आश्रम पणदूर येथे दाखल केले.

वयोवृध्द महिला शर्मिला यांचे मनोरूग्ण पती गोवा येथे वृध्दाश्रमामधे असून त्यांच्या मुलाचे तो सात वर्षाचा असताना निधन झाले. त्यामुळे पती पत्नीची मानसिक स्थीती बिघडली. शर्मिला या मोलमजूरी करून जीवन जगत होत्या. मात्र मधल्या काळात पती पत्नी आजारी असताना पती नारायण यांना उपचारासाठी पणजी गोवा येथे दाखल करण्यात आले. तर शर्मिला यांचेवर शेजा-यांनी चालु उपचार केले. मात्र वयोवृध्द झाल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी कोणी नसल्याने आणि त्यातच त्यांचे राहते घरही मोडून पडल्याने राहण्यासाठी जागा नाही अशी अवस्था होती.

दिनांकः५ डिसेंबर,२३ रोजी शर्मिला यांचे बंधु नारायण यशवंत मयेकर यांनी संविता आश्रमात येवून शर्मिला यांना सांभाळण्यास ते तयार असल्याचे सांगून घेवून गेले. शर्मिला यांच्या भावानेच त्यांना सांभाळण्याची जबाबदारी घेतल्याने शर्मिला यांचे कुटुंब पुनर्मिलन घडून येण्यास मदत झाली. संविता आश्रमातील प्रतिक्षा सावंत, जान्हवी मिठबावकर व विजया कांबळी यांंचेसह काळजी वाहकांनी शर्मिला यांची आश्रमात काळजी घेतली.

error: Content is protected !!