सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नितेश राणे यांचे प्रत्येक वक्तव्य आपल्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी असते त्यामुळे आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्व देत नाही. नितेश राणे जवळपास चौदा वर्षे काँग्रेस पक्षात होते. काँग्रेस पक्षामधूनच पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्षात भ्रष्टाचार दिसला नाही त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे गोडवे गात होते आणि आता त्याच काँग्रेस पक्षातील प्रत्येकजण त्यांना भ्रष्टाचारी वाटतो हाच मोठा विनोद आहे. त्यांचे वडील नारायण राणे यांनी 2017 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. परंतू नितेश राणे यांनी काँग्रेस पक्षाची आमदारकी जाईल म्हणून स्वतःच्या वडीलांच्या स्वाभिमान पक्षात न जाता आमदारकी टिकवण्यासाठी 2019 पर्यंत काँग्रेस पक्षातच राहिले. स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या वडिलांना व त्यांच्या स्वाभिमान पक्षाला वाऱ्यावर सोडले. आताही त्यांच्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षावर टिका करण्यात त्यांचा स्वार्थ दडलेला आहे. अशा प्रकारची टिका केल्यामुळे आपले वरिष्ठ खूष होतील आणि आपल्याला महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी भोळी आशा नितेश राणे यांना वाटते. परंतू भाजप आणि काँग्रेस यांच्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. काँग्रेसने नितेश राणे यांना काँग्रेस पक्षात असताना जेवढा मान सन्मान दिला तसा मान सन्मान भाजपमध्ये मिळणे अशक्य आहे हे 2019 मध्ये अतुल काळसेकर यांच्या हस्ते पक्षात प्रवेश देऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दाखवून दिले आहे अशी नितेश राणे यांच्या टिकेवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.