विशेष संपादकीय
राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या एजंटांवर नुकतीच 26 डिसेंबर रोजी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव आणि कणकवली पोलिसांनी ठोस कारवाई करत गुन्हा दाखल केला. ही कारवाई जरी लहान असली तरी ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारी ठरलीय आणि जे या जुगारात बरबाद झालेत त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ठरलीय. त्यामुळे ऑनलाईन जुगाराची ज्या ज्या कुटुंबाला झळ बसलीय, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार पोलीस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या टीम ला मनापासून आशीर्वाद देतायत.तशा प्रतिक्रिया अनेकजणांनी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलकडे बोलून दाखवल्यात. ज्या सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय ते म्हणजे या ऑनलाईन जुगाराच्या बाजारातील हिमनगाचे टोक म्हणावे लागेल कारण यातील रथी महारथी अद्याप पोलिसांच्या रडारवर आलेले नाहीत. पोलिसांची इच्छाशक्ती असेल तर कोणताच अवैध धंदा हा खाकी च्या कारवाईपासून वाचू शकत नाही याचे ही कारवाई म्हणजे प्रचिती आहे. याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी ऑनलाईन जुगारावर कारवाई कधीच करण्यात आली नव्हती. त्यामुळे कणकवली पोलीस ठाण्यात ऑनलाईन जुगारावर दाखल झालेला हा गुन्हा म्हणजे भविष्यात अन्य पोलीस ठाण्यातील इनचार्ज आणि अंमलदाराना एक प्रकारची गाईडलाईन ठरणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळेचऑनलाईन जुगारावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या गुन्ह्याची नोंद होऊ शकली. यासाठी दस्तुरखुद्द एसपी अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, डीवायएसपी यांचेही अभिनंदन आहेच. मूळातच कोणताही जुगार असो त्यात खेळणारा कधीच श्रीमंत होत नाही, तर खेळवणाराच कायम फायद्यात असतो. कारण जेव्हा एखादा खेळणारा हजारो, लाखो कमवत असतो तेव्हाच कैक जण त्याच्या कितीतरी पट रक्कम जुगारात हारलेले असतात. जसजसे प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आला तसतसे ऑनलाईन जुगाराचे फॅड ही वाढले. दरदिवशी एकट्या सिंधुदुर्ग जिह्यात ऑनलाईन रोलेट सारख्या जुगाराचा टर्नओव्हर हा 12 ते 15 लाखात आहे हे वास्तव आहे. इझी मनी कमावण्याच्या नादात कणकवली शहरासह तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ युवा पिढीच नव्हे तर घरचे कर्ते पुरुष सुद्धा लाखाचे खाक करून बसले आहेत.आणि त्यावर कडी म्हणजे एकदा जुगाराची सवय लागली की भले स्वतःकडे पैसे नसले तरी ऑनलाईन जुगार एजंटांकडून कर्जाऊ पैसे घेऊन सुद्धा जुगार खेळायला लागतात. आणि याच सवयीतून स्वतःच्याच हाताने घरची आर्थिक घडी पूर्ण बिघडवून टाकतात. कोणी भविष्यकालीन तरतूद म्हणून केलेली फिक्स डिपॉझिट मोडून जुगारातील देणे देतो, तर कोणी गाड्या विकतो, कोणी दागिने गहाण ठेवतो . याच ऑनलाईन जुगाराचा छंद लागलेले अगदी मिशीही न फुटलेले अगदी किशोरवयीन मुलेही यात गुरफटली आणि भीतीपोटी स्वतःचे जीवन संपवून बसली ही वस्तुस्थिती आहे .फक्त लोकलज्जेस्तव याचा बोभाटा करण्यापेक्षा विधिलिखित आपले भोग म्हणून ऑनलाईन जुगाराविरोधात कायदेशीर पाऊल कुठल्या पालकांनी अथवा मृताच्या नातेवाईकांनी आजवर उचलले नव्हते.त्यामुळे ऑनलाईन जुगार एजंटांचेही मनोबल वाढतच गेले.आमच्यावर कसली कारवाई होऊच शकत नाही कारण ऑनलाईन जुगार कायद्याच्या कक्षेबाहेर असल्याचा गोड गैरसमज या जुगार एजंटांचा झाला. या गोड गैरसमजाचा भोपळा फोडत कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव व त्यांच्या सहकारी पोलिसांनी 26 डिसेंबर रोजी धडक कारवाई करत कणकवली शहरातील 6 ऑनलाईन जुगार एजंटांवर कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करत ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी वापरात असलेले मोबाईलही जप्त केले आहेत. भले ही कारवाई तूर्तास लहान स्वरूपाची वाटत असली तरीही ऑनलाईन जुगार एजंटांना जो कायद्याचा धाक नव्हता तो धाक हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता बसलाय. या ऑनलाईन जुगाराच्या नादी लागून ज्यांचे कुटुंबीय, नातेवाईक ,मित्र भरडले गेलेत ते आता खाकी वर्दीला मनातून आशीर्वाद देतायत.