खारेपाटण (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील मौजे माणगाव येथे दत्तमंदिर असून त्याठिकाणी अन्नछत्रही चालविण्यात येते. या अन्नछत्रात पोटाला अन्न मिळते म्हणून तालुक्यातील एक निराधार व्यक्ती सुभाष सखाराम दुखंडे (वयः६७) हे गेल्या दोन महिन्यापासून मंदिरात राहत होते.मात्र राहायला निवारा व अन्न मिळणे मुश्किल झालेल्या या निराधार बांधवांला नुकतेच सविता आश्रम ने आधार दिला असून त्यांना पणदूर येथील दाखल करण्यात आले आहे.
सुभाष दुखंडे या वयोवृध्द व निराधार माणसाला नियमित अन्नाबरोबरच विश्रांती,आरोग्य उपचार आणि निवासाचे सुरक्षित ठिकाण मिळायला हवे. या उद्देशाने माणगाव मंदिर येथील दुकानदारांनी पुढाकार घेवून सुभाष यांचे बाबतीत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना कळविले.संदिप परब यांनी याविषयी तात्काळ दखल घेवून कुडाळ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून सुभाष दुखंडे यांना संविता आश्रमात दाखल केले. यावेळी संविता आश्रमचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत व विजय नाईक हे सहकारी सोबत उपस्थित होते. सुभाष दुखंडे हे मौजे कुडावल येथील असल्याचे समजते. सद्या आश्रमातील सेवक व कार्यकर्ते सुभाष दुखंडे या वयोवृध्द व्यक्तीची काळजी घेत आहेत.













