शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना रोजगारची आवड हाच उद्देश
चौके (अमोल गोसावी) : चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ.ता.चव्हाण म. मा. विद्यालय चौके आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यामार्फत भ.ता. चव्हाण म.मा. विद्यालय चौके या ठिकाणी परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन हा जोडधंदा आर्थिक सुबत्ता मिळवून देऊ शकतो ही बाब ध्यानात घेऊन कुक्कुटपालना संदर्भात पिल्लांची वाढ खाद्य अधिवास लसीकरण या संदर्भात उत्तम माहिती या शिबिरात देण्यात आली.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कुक्कुटपालनासाठी प्रशालेतील 25 विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा कोंबड्या सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणाबरोबरच कुक्कुटपालन या जोडधंदाची आवड लागेल. यावेळी भगीरथ प्रतिष्ठान कडून नवीन मालनकर, टिकार पोल्ट्री सर्व्हिस चे मालक मनोहर टिकार आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील उद्योजक मधू कांदे यांनी उपस्थित विद्यार्थी पालक तसेचपंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. विचारलेल्या प्रश्नांचे या ठिकाणी योग्य प्रकारे निरसन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी, संस्था प्रतिनिधी शंकर गावडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मोहन गावडे तसेच पत्रकार नितीन गावडे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.














