प.पू.भालचंद्र बाबांच्या पालखीसह रौप्य महोत्सवी वर्ष सिंधुदुर्गची वारकरी पायी दिंडी सहा फेब्रुवारी रोजी पंढरपूर कडे मार्गस्थ होणार–

पंढरीसी जा रे आल्यांनो संसारा | दीनाचा सोयरा पांडुरंग || वाट पाहे उभा भेटीची आवडी | कृपाळु तांतडी उतावीळ ||

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पौष महिना सुरु झाला की वेध लागतात ते माघ पायी वारीचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पायी जाणाऱ्या दिंडीतील एक प्रमुख दिंडी म्हणजे परमहंस भालचंद्र महाराज मठ कणकवली येथून निघणारी दिंडी. वैकुंठवासी ह.भ.प. आबा पाटील महाराज यांच्या संकल्पनेतून ही दिंडी सुरु झाली. त्याला समर्थ साथ दिली ती वै.ह.भ.प. बाळासाहेब अंधारी यांनी. या दिंडीत कणकवली, वैभववाडी, मालवण, शिरगाव (देवगड) तालुक्यातील अनेक जेष्ठ वारकरी सहभागी झाले. सुरवातीच्या काळात खुप मेहनत घेऊन दोघांनीही ही दिंडी चांगल्याप्रकारे चालविली. दिंडीत शिस्त असावी असा आबांचा कटाक्ष असायचा. नंतरच्या काळात मालवण व शिरगाव येथून दिंड्या येवून ह्या दिंडीत सहभागी होऊ लागल्या.

सन २०२० मध्ये प. पू. भालचंद्र महाराज वारकरी पायी दिंडी मंडळ सिंधुदुर्ग या नावाने मंडळ रजिस्टर झाले. या वर्षी २४ वी दिंडी निघणार असून सन २०२४ – २५ हे दिंडीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अनेक वारकऱ्यांनी या वर्षी दिंडी सोबत परमहंस भालचंद्र बाबांची पालखी असावी अशी इच्छा प्रदर्शित केली. संस्थेने परमहंस भालचंद्र महाराज संस्थानला पालखी संदर्भात विनंती केली असता संस्थानच्या कार्यकारी संचालक मंडळाने मोठ्या मनाने आमच्या विनंतीला मान देऊन दिंडी सोबत पालखी नेण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे या वर्षी दिंडी साठी येणाऱ्या वारकऱ्यांनमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. अनेक नवीन लोकांनी दिंडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरवर्षी साधारण अंदाजे १२५ /१५० वारकऱ्यांची संख्या ह्या वर्षी २२५ /२५० पर्यंत जाईल असा अंदाज आहे.

दरवर्षी न चुकता सामील होणारे अनेक वारकरी आहेत. हे सर्व शुद्ध भाव ठेवून सामील होतात. दिंडीच्या नित्य कार्यक्रमांत ते एकरुप होऊन जातात. पहाटे श्री तारी महाराज व मंडळी काकड आरती करतात व दिंडी पहाटे ठीक ५:०० वाजता मार्गस्थ होते. त्यात कोणताही बदल होत नाही. दिंडीचे चोपदार साटम महाराज वेळेच्या बाबतीत फार दक्षता घेतात. पहाटेच्या वेळी राम कृष्ण हरी च्या गजरात चालणारी दिंडी त्या लयीत एकरुप होते. तो आनंद अवर्णनीय असाच असतो. साधारण ७:३० वाजता नाष्टा होतो. साधारण दुपारच्या मुक्कामाला अंदाजे ११:३० पर्यंत पोहोचते. दिवसभर अभंग भजन गजर चालू असतो. सायंकाळी हरिपाठ होतो. रात्री च्या मुक्कामाला दिंडी ७:३० पर्यंत पोचते. रात्री भजन किंवा किर्तन, आरती होऊन कार्यक्रम संपतो. जसजसे पंढरपूर जवळ येते तसतसा चालत निघालेल्या वारकऱ्यांचा उत्साह वाढत जातो. अष्टमी किंवा नवमी च्या रात्री दिंडी पंढरपूर मुक्कामी पोहोचते.

ह्या वर्षी दिंडी मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. गायकवाड महाराज, ह.भ.प. गवंडळकर महाराज, संस्थानचे अध्यक्ष सन्मा. कामत साहेब व संस्थानचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पुजन होवून दिंडी राम कृष्ण हरी च्या गजरात मार्गस्थ होईल.

दिंडी सोहळ्याचे नियोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी श्री ह.भ.प.गायकवाड महाराज, श्री शाम लाड,लाड गुरुजी,हर्षल अंधारी, दिपक मडवी,आर्डेकर,मालवणचे श्री दुधवडकर, श्री कांदळकर, श्री पराडकर तर शिरगाव देवगडहून दिंडी चे चोपदार सर्वोत्तम साटम प्रविण शेट्ये,रेखाताई गावडे, इ. परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!