कणकवली कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कॉलेज, कनिष्ठ विभागामार्फत संपन्न झालेल्या क्रीडा महोत्सवाचे प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारंभ नुकताच एचपीसीएल सभागृहात संपन्न झाला.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा.युवराज महालिंगे तसेच पर्यवेक्षक प्रा.कांतीलाल जाधवर,व्यावसायिक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे, क्रीडा शिक्षिका प्रा.जयश्री कसालकर,प्रा.विजयकुमार सावंत,प्रा.गोपाळ पाटील,प्रा.विजय सावंत उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये प्रा.जयश्री कसालकर म्हणाल्या, खेळाडू हा स्वतःहून पुढे येत आहेत त्यामुळे खेळाडूवर मेहनत घेताना आनंद वाटतो.वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर 34 खेळ प्रकारात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमक दाखवली व विशेष प्राविण्यही मिळविले. एकूण 55 मुलांना विभागीय व राज्य पातळीवर प्राविण्य मिळवल्याबद्दल चालू शैक्षणिक वर्षात ग्रेस गुण ही मिळणार आहेत.

अध्यक्ष भाषणात प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले, आपल्या महाविद्यालयात सर्व खेळांना प्रोत्साहन दिले जाते. खेळाडूं बरोबर पालकांचे चांगले सहकार्य मिळते त्यामुळे आपला विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी झाला की आम्हालाही अभिमान वाटतो. क्रीडा शिक्षिका जयश्री कसालकर यांचे खास कौतुक केले. मुलांमध्ये कुमार शुभम चव्हाण व मुलीमध्ये कुमारी स्वराली परब यांना जनरल चॅम्पियनचा मान मिळाल्याबद्दल तसेच विभागीय व राज्यस्तरावर खेळलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक प्रा. कांतीलाल जाधवर व प्रा. हरिभाऊ भिसे यांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. विजय सावंत व आभार प्रा. विजयकुमार सावंत यांनी मांनले. कार्यक्रम प्रसंगी कनिष्ठ विभागाचे शिक्षक बंधू-भगिनी, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!