खारेपाटण हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

प्रमुख पाहुणे म्हणून मधुकरशेठ गुरव यांची उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम खारेपाटण या प्रशालेमध्ये शैशानिक वर्ष २०२३ – २४ चे शालेय विद्यार्थी गुणगौरव तथा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच खारेपाटणमधील प्रसिद्ध उद्योजक मधुकरशेठ गुरव आणि टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटर मधील निवृत्त विज्ञान संशोधक शरद लिखिते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याद्यापक संजय सानप यांनी प्रस्ताविकामध्ये प्रशालेची यशस्वी वाटचाल या संदर्भात मार्गदर्शन केले. तर मान्यवर पाहुण्यांचा परिचय प्रशालेचे जेष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे यांनी केला. त्यानंतर जवळजवळ २५ विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवणाऱ्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांचा या समारंभामध्ये गौरव करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलताना मधुकरशेठ गुरव यांनी खारेपाटण प्रशालेचा गौरवशाली इतिहास नमूद केला. तसेच या प्रशालेच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असा शब्द दिला.तसेच प्रमुख पाहुणे विज्ञान संशोधक शरद लिखिते यांनी विज्ञान विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य यापुढेही दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच कुठलीही मदत लागल्यास संस्थेकडून मदत केली जाईल याची ग्वाही दिली.

या कार्यक्रम प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सहसचिव राजेंद्र वरूणकर, संचालक व सिनियर कॉलेज प्राचार्य डॉ.ए डी.कांबळे, खारेपाटण प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष राऊत, तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले. तसेच पारितोषिक वितरण समारंभाची धुरा सहायक शिक्षक रामदास कापसे यांनी सांभाळली.तर पारितोषिक वितरण समारंभाचे नियोजन प्रशालेच्या बक्षीस विभाग प्रमुख सौ.महिंद्रे मॅडम व अमृते मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन भोर मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!