धरणग्रस्तांचा आक्रमक पवित्रा
वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणाच्या कालव्याचे काम बंद आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी धरणग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली. माञ या चर्चेतुन विहीरीबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी जोपर्यंत विहीरीचे काम सुरु होत नाही. तोपर्यंत कालव्याचे काम सुरु देणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी नाही तर गावठाणात जाऊन काय करणार ? असा सवाल करीत प्रसंगी संपूर्ण कुटुंबासह प्रकल्पस्थळी संसार थाटण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.
हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील पाणी प्रश्न व अन्य समस्यांकडे लक्षवेधण्यासाठी धरणग्रस्तांनी सोमवारपासून येथील धरणग्रस्तांनी प्रकल्पस्थळी जाऊन कालव्याचे काम बंद पाडले आहे. गुरुवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता हर्षल यादव, उपअभियंता श्री मगरे यांनी प्रकल्पस्थळी येऊन धरणग्रस्तांशी चर्चा केली. सध्या असलेल्या विहीरीतुन पंप दुरुस्त करुन पाणी पुरवठा सूरु करतो असे सांगीतले. माञ सदर विहीरीचा रितसर ताबा दया अन्यथा आम्हांला नवीन विहीर खोदुन दया. अशी मागणी लावून धरली. तर नवीन विहीरीसाठी प्रस्ताव केला आहे. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. माञ जोपर्यंत विहीरीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही. तोपर्यंत धरणा संबंधित कोणतेही काम आम्ही करु देणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतली. या चर्चेतुन ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे धरणग्रस्त काम बंद आंदोलनावर ठाम राहीले आहेत.
हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणासाठी हेत बांबर येथे विहीर बांधण्यात आली आहे. या विहीरीवरुन गावठाणाला पाणी पुरवठा करण्यात आला आहे. या विहीरीचा ताबा देण्यात यावा. अशी मागणी धरणग्रस्तांकडून करण्यात येत आहे. माञ ही विहीर तुमच्यासाठी नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. असे असेल तर गावठाणासाठी स्वतंत्र विहीर देण्याची मागणी धरणग्रस्त करीत आहेत. माञ याकडे पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप करीत धरणग्रस्तांनी धरणाच्या कालव्याचे काम रोखून धरले आहे. गेले पाच दिवस प्रकल्पस्थळी वयोवृध्द, महीलासह धरणग्रस्त ठाण मांडून बसले असून प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. तर आम्ही पुनर्वसन गावठाण सोडून येथेच आपला संसार थाटणार असा इशारा दिला आहे. पाणी नाही तर आम्ही पुनर्वसन गावठाणात जाऊन तरी काय करणार असा सवाल करीत आहेत.
नळयोजनेमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे आठ आठ दिवस पुनर्वसन गावठाणात पाणी येत नाही. पुनर्वसन गावठाण हे उंचावर असल्यामुळे येथे पाण्याचा दुसरा कोणताही स्ञोञ नसल्यामुळे धरणग्रस्तांना नळयोजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. गेले आठ दिवस नळयोजनेची मोटार बिघडल्यामुळे पुनर्वसन गावठाणात पाणी मिळाले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
यावेळी माजी सरपंच सुरेश नागप, शिवाजी पडीलकर, सुनिल नागप, विजय नागप, महादेव नागप, मानाजी घाग, धोंडू नागप, विनोद नागप, परशुराम पडीलकर, यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते. दरम्यान शुक्रवारी ग्रामपंचायत आखवणे भोमच्या सरपंच आर्या कांबळे , उपसरपंच आकाराम नागप, व सर्व सदस्य यांनी प्रकल्पस्थळी जाऊन या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेच विहीरीसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने कार्यकारी अभियंता यांना पञ दिले आहे.













