जिल्हा यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज – जिल्हाधिकारी किशोर तावडे
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने देशाच्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली असून राज्यातील तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ६ लाख ५७ हजार ७८० मतदार निश्चित झाले आहेत. यात ५ हजार ७५९ एवढे १८ ते १९ वयोगटातील नव मतदार आहेत. यावर्षी १०० टक्के मतदारांकडे फोटो मतदान ओळखपत्र आहे, अशी माहिती लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तावडे यांनी आपल्या दालना शेजारील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तावडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५७ हजार ७८० मतदार निश्चित झाले आहेत. यात कणकवली विधानसभा मतदार संघात २ लाख २५ हजार ५८८, कुडाळ मतदार संघात २ लाख १० हजार ३७८ तर सावंतवाडी मतदार संघात २ लाख २१ हजार ८१४ मतदार निश्चित झालेले आहेत. त्यात १८ ते १९ वयोगटातील ५ हजार ७५९ नव मतदारांचा समावेश आहे. ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले ७ हजार ५६५ दिव्यांग मतदार आहेत. तर ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले १३ हजार १५१ मतदार आहेत. यासाठी जिल्ह्यात ९१८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, असे यावेळी सांगितले.













