काळसे, धामापूर हद्दीतील रस्त्यावर गतिरोधक घालण्यास सुरुवात; सरपंच, ग्रामस्थांच्या मागणीला यश

आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांचेही प्रयत्न.

चौके (प्रतिनिधी) : मालवण – चौके – कुडाळ या मार्गावर काळसे आणि धामापूर गावच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर आज दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठीकठिकाणी गतिरोधक घालण्यास होबळीचा माळ येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणचे सहाय्यक अभियंता पी. डी. पाटील काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर , धामापूर सरपंच सौ. मानसी परब , माजी सभापती राजेंद्र परब , योगेश राऊळ , निवृत्त पोलीस अधिकारी संतोष वालावलकर , निवृत्त तहसीलदार शरद गोसावी , रमेश मयेकर , महेश परब , राजू परब , अण्णा गुराम, कमलाकर आजगावकर , विजय काळसेकर , नागेश कारुडेकर , महेश काळसेकर , विपुल माळगांवकर , हर्षद खोत , संजय कोळगे , चिंतामणी प्रभु आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार आवश्यक ठिकाणी गतिरोधक घालण्यात येत आहेत.
दरम्यान भरधाव वाहनांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसावा म्हणून काळसे धामापूर ग्रामस्थ गतिरोधक घालण्याची मागणी वारंवार करत होते. त्यात १५ दिवसांपुर्वी ९ फेब्रुवारी रोजी काळसे होबळीचा माळ येथे झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरने पाच महिलांना उडवले होते. त्यात श्रीमती रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू होऊन इतर चार महिला जखमी झाल्यानंतर काळसे ग्रामस्थांनी आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन केले होते , आणि तातडीने गतीरोधक घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर काळसे सरपंच विशाखा काळसेकर आणि धामापूर सरपंच मानसी परब आणि ग्रामस्थ यांनी १५ फेब्रुवारी रोजी एकत्रीतपणे जाऊन जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक , प्रादेशिक परिवहन अधिकारी , आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देउन काळसे धामापूर हद्दीतील मुख्य रस्त्यावर गतिरोधक घालण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अपघातात मयत झालेल्या रुक्मिणी काळसेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या गतिरोधकाच्या मागणीचा पाठपुरावा करु असे आश्वासन दिले होते. आणि त्याप्रमाणे त्यांनी बांधकाम विभागास तातडीने गतिरोधक घालण्यासाठी आदेशही दिले होते.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना अखेर आज यश आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष गतिरोधक घालण्यास सुरुवात केली आहे. या गतिरोधकांमुळे या मार्गावरून डंपर आणि अवजड वाहनांच्या भरधाव रित्या होणाऱ्या वाहतूकीला काही प्रमाणात ब्रेक लागणार आहे. त्यामुळे काळसे धामापूर ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक , माजी खासदार निलेश राणे आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!