खात्यात सुरुय जोरदार चर्चा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अलीकडेच कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या मोठ्या खात्यातील अत्यंत महत्वाची जबाबदारी असलेल्या शाखेतील एका कर्मचाऱ्याची कार जळाली. शॉर्ट सर्किट ने कार जळाल्याची बातमी असली तरी ह्या बातमी मागील बातमी काही वेगळीच असल्याची चर्चा आहे. खात्यातील महत्वाच्या शाखेत कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याची ” ट्रान्सपोर्ट ” ची जबाबदारी असल्याची चर्चा आहे. या ” ट्रान्सपोर्ट ” मधून लिकर माफियांशी आलेले संबंध आणि त्यातूनच काहीतरी बेदिली होऊन त्याचे रूपांतर थेट कार जळीत प्रकरण घडल्याची जोरदार चर्चा डिपार्टमेंट मध्ये सुरू आहे. जर हे सत्य असेल तर लिकर माफियांनी ज्याना घाबरायला हवे त्या कायद्याचे रक्षक असणाऱ्यांच्या घरालगत जाऊन त्यांची कार जाळण्याची हिम्मत लिकर माफियांची कशी होते ? हा सवाल सध्या खात्यात चर्चेत आहे. जेव्हा आपण मिंधे होतो तेव्हाच जे लिकर माफिया आपल्याला घाबरायला हवे ते आपल्यावर उलटतात. ही ऍडजस्टमेंट दोन्ही बाजूनी गोडीगुलाबीने सुरू असेपर्यंत सर्व ठीक असते. सिस्टीम मधील ऍडजस्टमेंट ही दोन्ही बाजूनी सारासार विचार करून होते. पण जर ह्या ऍडजस्टमेंट पेक्षा जास्त अपेक्षा आणि हाव निर्माण होते तेव्हाच असा प्रकार घडतो असेही खात्यात चर्चिले जातेय. ही अधिकची ऍडजस्टमेंट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर हात ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी असते हेही उघड आहे. कार जळीत प्रकरण म्हणजे लिकर माफियानी दिलेला एक प्रकारे रेड सिग्नल असून सुधारणा झाली नाही तर आज कार जाळली उद्या जीवितहानी सारखी गंभीर दुर्घटना होऊ शकेल असा गर्भित इशाराच यातून दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणात खात्याची बदनामी होत असून खात्यापेक्षा स्वतःला मोठा समजणाऱ्या त्या कर्मचाऱ्यालाच बदली ने दुसरीकडे पाठवावे असाही सूर खात्यात उमटत आहे.












