महिलेसह दोघांना कोल्हापूर पोलिसांनी केली अटक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली, याचा राग मनात धरून महिलेने मित्र व मुलाच्या मदतीने प्रियकराचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बॅगेत घालून तो रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री गस्तीच्या पथकाने कोल्हापूर आजरा रोडवर बहिरेवाडी घाटात संशयित महिला व तरुणास अटक केली आणि हा खुनाचा गुन्हा उघड केला.
गजेंद्र सुभाष बांडे वय 38 राहणार जिंतूर जिल्हा परभणी असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनीता देवकाई वय 44 तिचा मुलगा सुरज देवकाई (दोघे राहणार विठ्ठल मंदिर शेजारी खापोली तालुका खानापूर जिल्हा रायगड) आणि मित्र अमित पोटे (राहणार सुळे,तालुका आजरा) यांना अटक केली आहे. या तिघांवर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघड करण्यासाठी मदत केली.
सुनिता आणि गजेंद्र यांच्यात प्रेम संबंध होते. गेल्या दोन वर्षापासून ते एकत्र राहत होते. गजेंद्र यांनी सुनीताला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सुनीता कडून त्यांने पैसे घेतले होते. मात्र सध्या तो लग्न करण्यास नकार देत होता तसेच सुनिता कडून घेतलेले पैसे हे परत देणार नाही असे सांगत होता .यामुळे सुनिता त्याच्यावर चिडून होती. 27 मार्च रोजी रात्री नऊ वाजता सुनीताने गजेंद्रला दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्या .गजेंद्र बेशुद्ध झाल्यानंतर सुनीताने आपला मित्र अमित पोटे याला बोलून घेतले आणि दोघांनी मिळून गजेंद्रचा गळा आवळून खून केला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेट्रोल ओतून जाळून टाकायचा असे त्यांनी ठरवले होते .बाजारातून एक प्रवासी बॅग आणली मृतदेहाचे हात पाय बांधून हा मृतदेह बॅगेत ठेवला. आणि एक कार भाड्याने घेतली यातून हे तिघेजण कोल्हापूरच्या दिशेने येत होते. आजरा तालुक्यातील बहिरेवाडी चेक पोस्ट नाक्याजवळ आल्यानंतर आपली गाडी पोलीस चेक करतील या भीतीपोटी सुनीताने चालकाला गाडी इथे थांबू नकोस वेगाने पुढे चल असे सांगितले. त्यामुळे कारचालक तेथे न थांबता वेगाने पुढे आला.
गस्तीपथकातील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या रोडवरील सर्व गस्तीपतकांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या मार्गावर गस्त घालत होते . पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने परिसरात शोध मोहीम राबवली. आजरा निपाणी रोडवर एका घाटात सुनिताने कार थांबवली आणि मृतदेहाची बॅग बाहेर काढून एका झुडपात नेऊन ठेवली ,त्या ठिकाणी पेट्रोल ओतून हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार गस्तीपथकातील पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पथकाने सुनीता व तिच्या सोबत असणाऱ्या एका तरुणाला अटक केली. तसेच गजेंद्र याचा मृतदेह ताब्यात घेतला .सुनीताने आपणच गजेंद्रचा खून केल्याची कबुली दिली .त्यानुसार आजरा पोलीस ठाण्यात सुनिता तिचा मुलगा आणि मित्र अशा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.