पुढच्या पाच वर्षात वैभाववाडीत एमआयडीसी उभी राहिलेली पाहायला मिळेल नितेश राणेंची ग्वाही
वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षांत नारायण राणे यांच्या माध्यमातून, आमदार फंडातून वैभववाडी तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. वैभववाडी तालुका राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावांत तळागाळातील लोकांपर्यंत विविध योजना , विकास कामे पोहोचवली आहेत त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये ३००-४०० मते आणायची ताकत आहे असा ठाम विश्वास आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात 80 ते 90 कोटी निधी आपण भाजपाच्या माध्यमातून आमदार या नात्याने तालुक्यात आणला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही विचार न करता ९० ते ९५ % मतदान कसे होईल हे पाहावे असे आवाहन केले.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारत महासत्तेचे वाटचाल करतोय, विविध कल्याणकारी योजनां बरोबर आज जलजीवन मिशन पाण्याची योजना गावा गावात आणल्याचे देखील त्यांनी सांगितले. कोरोना काळात केंद्र सरकारने मोफत धान्य वितरण शिवाय सर्व नागरिकांना लसीकरणाचा लाभ देखील भाजपाचे सरकार केंद्रात असल्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. वैभववाडीत पुढच्या पाच वर्षात एमआयडीसी उभी राहिलेली पाहायला मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. प्रचारा दरम्यान विनायक राऊत दारात आले तर आपण गेल्या सहा वर्षांत काय विकासकाम केली ? असा प्रश्न विचारा असे कार्यकर्त्यांना सांगितले. कित्येक वर्षे सतावणारा गगनबावडा घाटमार्गाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून नारायण राणे यांच्या समवेत नितिन गडकरी यांच्याशी चर्चा करून गगनबावडा घटासाठी २३८ कोटी निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण आणला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वेळी भाजपची मते विनायक राऊत यांना मिळाली नसती तर विनायक राऊत खासदार झालेच नसते असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, आचारसंहिते नंतर तालुक्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्याची त्यांनी ग्वाही देखील यावेळी दिली.











