मिठमुंबरी – बागवाडी बीचवरुन तब्बल ११८ ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात विसावली
देवगड ( प्रतिनिधी) : १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मिठमुंबरी बीचवर ऑलिव्ह रिडले कासवांची एका घरट्यातून १२३ अंड्यापैकी ८१ पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून ९५ पैकी ३७ पिल्ले सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आली. याप्रसंगी वनविभागाचे देवगड विभागाचे वनरक्षक निलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक उपस्थित होते. या प्रसंगी मिठमुंबरी गावाचेसरपंच बाळकृष्ण गांवकर, कांदळवन समितीचे बीच मॅनेजर लक्ष्मण तारी, गाबीत समाज देवगड अध्यक्ष संजय पराडकर. प्रियांका तारी आदि मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच कुतुहल पाहायला मिळाले.
कासव संवर्धनच्या माध्यमातून वनविभाग – सावंतवाडी, कांदळवन कक्ष – मालवण व कांदळवन प्रतिष्ठान – मुंबईच्या माध्यमातून आगामी काळात या मिठमुंबरी बीचवर कासव महोत्सव आयोजित करण्यात यावा जेणे करून बहुसंख्य ग्रामस्थ व पर्यटक यांना कासव संवर्धनाचे महत्त्व व येथील संपन्न जैवविविधतेची परिपुर्ण माहिती घेता येईल व कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटता येईल अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.
सदर कासव संवर्धन मोहीम राबवण्यासाठी बागवाडीचे ग्रामस्थ नारायण तारी व मयुरेश तारी, ओमकार तारी यांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी ग्रामस्थ प्रमोद आडकर, रोहन तारी, अभय पराडकर, नंदकिशोर पराडकर, हितेश खवळे, भुषण टिकम आणि मिठमुंबरी बीचवरील बहुसंख्य पर्यटक यावेळी उपस्थित होते.
या ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी ही २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घरट्यात जमा केली होती. सदर पिल्ले तब्बल ५३ दिवसांनी अंड्यातून बाहेर पडली. अतिशय निरागस चिमुकली पिल्ले एकामागोमाग एक तुरु तुरु चालत सुखरूपपणे समुद्रात आपल्या आईकडे झेपावली आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ व पर्यटक यांच्या चेहऱ्यावर एकच समाधान व आनंद दिसून आला. यावेळी लहान मुलांनी देखील या दृश्याचा मनमुराद आनंद लुटला.












