तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन
ब्युरो न्यूज (मुंबई) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘प्रेशर कुकर’ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केलं आहे. अकोल्यातील फतेह चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.
औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून दंगलीचा माहोल आम्ही दोन ते तीन तासात संपवून टाकला, ही वस्तुस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. एक वेळ होती की, महाराष्ट्र या देशाला राजकारण आणि समाजाचा व्यवहार कसा असावा हे शिकवत होता. 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितींचे गठण हे कायदेशीररीत्या केले. आणि त्यामध्ये म्हटले की, शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितींमध्ये विकला गेला पाहिजे, असा इतिहासाचा दाखलाही आंबेडकर यांनी दिला.