ओरोस (प्रतिनिधी): कसाल येथील समाज मंदिराला एका व्यक्तीने स्वतःची मालमत्ता समजत त्यात बँजो ठेवत कुलूप केले असल्याची तक्रार येथील शशिकांत अनंत कसालकर यांनी जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शशिकांत कसालकर यांनी दिलेल्या निवेदनात, आपण गावचा कायमस्वरूपी रहिवाशी आहे. आपल्या वाडीत असलेल्या समाज मंदिरासाठी आपण दोन गुंट्ठे आणि विहिरीसाठी दोन गुंट्ठे जमीन मोफत दिली आहे. समाज मंदिर सार्वजनिक असून त्याची देखभाल कसाल ग्राम पंचायत करीत आहे. मात्र, येथील एका व्यक्तीने स्वतःची इमारत समजून त्यात बँजो ठेवत त्याचे गोडवून बनविले आहे. तसेच त्याला लॉक केले आहे. ग्राम पंचायत कर्मचारी लॉकची चावी मागण्यास गेले असता चावी देत नाही, असे सांगून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला.
याबाबत कसाल सरपंच, कुडाळ गटविकास अधिकारी यांना यापूर्वी निवेदन दिले आहे. गटविकास अधिकारी यांनी सदर लॉक काढण्याचे आदेश देवूनही अद्याप काढण्यात आलेले नाही. समाज मंदिर ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यात सभागृह असून तेथे डॉ आंबेडकर जयंती, महिला बचतगट यांच्या बैठका होतात. ही इमारत शासकीय मालमत्ता असल्याने कुणीही गैरवापर करू नये, असे फलक लावलेले आहेत. तरीही एका व्यक्तीने त्याला लॉक केले आहे. तरी यातील बँजो काढून समाज मंदिर खुले करावे. अन्यथा आपण त्याला दुसरे लॉक मारू. यामुळे वाडीत वाद घडल्यास ग्राम पंचायत व अधिकारी यांना त्रास सहन करावा लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.