विनायक राऊत यांनी काढली राणेंची हवा
कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी आणि नारायण राणेंचे घनिष्ठ संबंध असतील तर राणेंची उमेदवारी जाहीर करायला 13 व्या यादी पर्यंत राणेंना वाट का पहावी लागली ? रत्नागिरी सिंधुदुर्गात राणेंचा जनाधार घटला असल्याची नोंद उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावी अशी टीका इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी कासार्डे व बिडवाडी विभागाची सभा नांदगांव तिठा येथील सभेत राऊत बोलत होते.यावेळी सभेला संबोधित करताना विनायक राऊत यांनी वाढती महागाई, बेरोजगारी यासह राज्य व केंद्र सरकारच्या गलथान कारभारावर जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक व गोरगरीब जनतेला नाडले जात आहे आणि त्यातून जो रोष निर्माण होतोय त्याला आळा घालण्यासाठी एनआरसी सारखे कायदे आणून अल्पसंख्यांक लोकांना आणि गरिबांना किंवा जे जे लोकं भाजप विरोधी आहेत त्यांना हद्दपार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. फडणवीस येथे येऊन नारायण राणे यांची स्तुती करताना सांगतात की राणे यांचे थेट मोदी यांच्याशी संबंध आहेत. मग असे असेल तर नारायण राणे यांची उमेदवारी 13व्या यादी पर्यंत कुणी लांबावली..? राणे यांचा बीपी मधल्या काळात वाढला होता त्याला जबाबदार कोण..? असा मिश्किल टोला राऊत यांनी फडणवीस यांना लागवला. त्याचबरोबर नारायण राणे यांनी हल्लीच मोदी आणि अमित शाह यांच्यासह स्वतः फडणवीस यांचाही उदो उदो केला होता याची आठवण विनायक राऊत यांनी फडणवीस यांना करून दिली. आज नारायण राणे यांना लमाणी कामगारांना पैसे देऊन सभेला घेऊन यावे लागत असेल तर त्यांचा जनाधार या मतदारसंघात किती आहे याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी जरूर करावा असेही त्यांनी सुचवले. यावेळी पक्षाचे उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, उपनेते गौरीशंकर राऊत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलमताई पालव, काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राष्ट्रवादी शरद पवार चे जिल्हाध्यक्ष इर्शादभाई शेख, आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, कन्हैया पारकर, रमजान बटवाले, नागेश मोर्ये, संदीप कदम, सचिन सावंत, बाबी देव, संजय जोशी, वैदही गुढेकर, संजना कोलते आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












