महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार? बडा नेता भाजपात जावून राज्यपाल होणार ?-प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या अडीच वर्षांपासूनच्या घडामोडी वारंवार हेच सिद्ध करत आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या मोठ्या फुटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये विभाजन झालं. यानंतर काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना पक्षप्रवेश करताच राज्यसभेची खासदारकीदेखील भाजपकडून बहाल करण्यात आली आहे.
यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज एक नवा बॉम्ब टाकला आहे. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नाव घेतलं नसली तरी त्यांचा बोलण्याचा रोख हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिशेला होता का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचं आहे”, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी आज कराड येथे केला. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा हा नेता कोण? अशी चर्चा रंगली आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे बडे नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचा संबंधित दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणातला पुन्हा नवा भूकंप असू शकतो. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे खूप ज्येष्ठ नेते आहेत. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीदेखील आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना जन्मापासून राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे आई-वडील दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे काँग्रेससोबत पृथ्वीराज चव्हाण यांचं फार घनिष्ठ नातं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस हायकमांडचा देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्याबद्दल पक्षात आदर आहे. असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!