वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उपळे उपडेवाडी येथे गेल्या दहा बारा वर्षात कोणत्याही पक्षाने विकास काम केली नाहीत, असा आरोप करीत वाडीतील तब्बल 114 मतदारांनी मतदान न करण्याचा समुदाईक निर्णय घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला.
मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान पार पडले. मात्र उपळे उपडेवाडीने वाडीत गेल्या दहा बारा वर्षात कोणत्याचं पक्षाने कोणतेही विकास काम वाडीत केले नाही. विकास कामासाठी वेळोवेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून निवेदने दिली मात्र कोणत्याच राजकीय पक्षाने आमची दखल घेतली नाही. आमच्या वाडीत विकास काम केले नाही. असा आरोप करीत वाडीतील एकूण 114 मतदारांनी मतदानवर बहिष्कार टाकला. वाडीतील एकाही मतदारांनी मतदान केले नाही. असे वाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.
निवडणुकीच्या दिवशी अचानक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा उपडेवाडीने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची समजूत काढण्याची प्रशासनाला व राजकीय पदाधिकऱ्यांनाही संधी मिळाली नाही. वाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रावर अजिक्य उपडे, निर्मला अशोक उपडे, केशव उपडे, आकाराम उपडे, साक्षी उपडे, रसिका उपडे, निकिता उपडे, महेंद्र उपडे, तारामती उपडे, दत्ताराम उपडे, अनंत उपडे दीपक धोंडू उपडे, तानाजी उपडे यांच्यासह 114 मतदारांच्या या प्रसिद्धी पत्रावर सह्या आहेत.












