खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे करण्यात आले दाखल
जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली खारेपाटण ला धाव
खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंसेचे गालबोट लागले असून खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना कार्यकर्ते बाळा राऊत यांना मंगळवार दि. ७ मे रोजी सायं. ६.२० वाजता भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांना तातडीने खारेपाटण प्रा .आ.केंद्रात दाखल करण्यात आले असून खारेपाटण विभागात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी खारेपाटण येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले.
याबाबत आधिक वृत्त असे शेर्पे निवडणूक मतदान सायंकाळी ६.०० पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते बाळा राऊत हे शेर्पे दुकान येथे बसले असता अचानक ६.२० च्या दरम्यान दोन गाड्या भरून कार्यकर्ते व त्यांनी काही समजण्याच्या आत मला लाथा बुक्यानी व दांडयांनी मारहाण करून जीवे मरण्याची धमकी दिली असल्याचे जखमी शिवसैनिक बाळा राऊत यांनी सांगितले. तर भाजप पक्षाचे कार्यकर्ते बाळा जठार व दिलीप तळेकर, नाना शेट्ये यांसह भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे यावेळी बाळा राऊत यांनी सांगितले.
ही घटना समजताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, शिवसेना पदाधिकारी कन्हैया पारकर, कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने खारेपाटण येथे दाखल झाले. व खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे उपचार सुरू असलेले जखमी शिवसैनिक कार्यकर्ते बाळा राऊत यांची भेट घेतली.
तर कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांनी खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे उपचार घेत असलेल्या जखमी शिवसैनिक बाळा राऊत यांची तातडीची भेट घेतली. व मारहानीची घटना जाणून घेतली. व जखमी कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर जखमी बाळा राऊत यांना अधिक पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे शासकीय रुग्णवाहिकेने पुढे पाठवण्यात आले. तर रात्री उशिरा पर्यंत जबाब व गुन्हे नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान मारहाणीत सहभाग असलेल्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यावर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान आमच्या शेर्पे येथील कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर सखोल चौकशी करून मारहाणीचे गुंन्हे तातडीने दखल करा. जर हललेखोरावर पोलिसांनी कारवाई न केल्यास जिल्ह्यात शिवसेना. तथा महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी खारेपाटण प्र.आ.केंद्र येथे बोलताना दिला.














