वेल डन राहुल….५४% ; जायबंदी हातानी दिली बारावीची परीक्षा      

मसुरे (प्रतिनिधी) : बारावीची परीक्षा हा करियरच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा टप्पा मानला जातो. बोर्ड परीक्षेचे दोन पेपर देऊन झाल्या नंतर झाडा वरून खाली पडल्याने त्याचे दोन्ही हात जायबंदी झाल्याने प्लास्टर घातलेले तर पायांना सुद्धा जखमा झालेल्या मुका मार ठिकठिकाणी लागलेला अशा अवस्थेत त्याने प्रचंड आत्मविश्वास दाखवत उर्वरित चार पेपर परीक्षा केंद्रावर येत पूर्ण वेळ उत्तर पत्रिका सोडवत पूर्ण केले व ५४ टक्के गुण मिळवत यश प्राप्त केले. देवगड तालुक्यातील मुणगे सडेवाडी येथील राहुल घाडी या विद्यार्थ्याचे त्याने दाखविलेल्या या अनोख्या धाडसाबद्दल कौतुक होत आहे.  

मुणगे ज्यू. कॉलेजचा विध्यार्थी मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि  ज्यू कॉलेजमध्ये ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या ट्रेडचा बारावी मध्ये शिकणारा राहुल घाडी हा विध्यार्थी. अभ्यासात सर्व सामान्य असला तरी कार्यशाळेत काम करताना प्रचंड उत्साही असा हा विध्यार्थी! बारावीची बोर्ड परीक्षा आचरे केंद्रावर सुरू झाल्यावर सुरवातीचे दोन पेपर त्याने दिले होते. तिसरा पेपर चार दिवसानी असल्यामुळे वाडीतील आंब्याच्या झाडावर फवारणी करण्यासाठी तो चढला होता. सुमारे १५ फुटांपेक्षा जास्त उंचीवरील फांदीवर तो फवारणी करत असताना त्याने पाय ठेवलेली आंब्याच्या झाडाची फांदी तुटली व तो क्षणार्धात जमिनीवर आदळला. कातळ भाग असल्याने त्याचे दोन्ही हात व एक पाय जायबंदी झाले.

अधिक उपचारासाठी कणकवलीत सुदैवाने डोकी किंवा इतर कुठे मार न लागल्याने लागलीच त्याला कणकवली येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार घेत असताना आपण उर्वरित पेपर न दिल्यास आपल्या कॉलेजच्या १००टक्के निकालाच्या परंपरेवर परिणाम होईल अशी एकच खंत त्याला लागून राहिली होती. त्यामुळे त्याने याबाबत कॉलेजच्या शिक्षकांशी संपर्क साधत पेपरला येणार असल्याचे सांगितले. दोन्ही हातांना प्लास्टर घातलेले असले तरी त्याची हाताची बोटे मोकळी असल्याने लिहिता येणे शक्य असल्याचे त्याने सांगितले.

डिस्चार्ज घेत  परीक्षा केंद्र गाठले तिसऱ्या पेपर दिवशी सकाळी दवाखान्यातून डिस्चार्ज घेत त्याने थेट आचरे येथे परीक्षा केंद्र गाठले. या मिशन मध्ये राहुलला त्याच्या  भावाची चांगली साथ लाभली. पेपर पूर्ण होई पर्यंत राहुलचा भाऊ परीक्षा केंद्रा बाहेर बसून असायचा व पेपर संपल्या नंतर त्याला मोटारसायकलने घरी घेऊन जायचा. त्याच्या शिक्षकांनी सुद्धा त्याची गैरसोय होऊ नये यासाठी लक्ष दिला. हात व पायात प्लास्टर घालूनच राहुल याने उर्वरित चार पेपर लिहिले. १०० टक्के निकालासाठी भरीव योगदान त्याच्या या श्रमाना नियतीने फळ सुद्धा चांगले देत ५४ टक्के गुण मिळवत तो नुकताच पास झाला आहे. स्वतः च्या करियरचे  वर्ष वाया जाऊ नये तसेच आपल्या कॉलेजचा निकाल दरवर्षी १००% लागतो त्यामध्ये कुठेही आपल्या मुळे खंड पडू नये या जाणिवेने राहुलने मिळविलेले यश निश्चितच अभिनंदनीय आहे.त्याने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. 

error: Content is protected !!