खुनाच्या गुन्ह्यात समीर पेडणेकर ला 2 दिवस पोलीस कोठडी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : साटेली भेडशी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर ज्ञानेश्वर पेडणेकर ( वय 36, रा. झरेबांबर, काजुळवाडी, ता दोडामार्ग ) याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साटेली भेडशी येथील वामन संकुल येथील इमारतीच्या मधल्या पॅसेजमध्ये अमर मनोहर देशमाने याचा मृतदेह 22 मे रोजी सकाळी 7 च्या सुमारास आढळला होता. मयत अमर च्या डोक्यावर लाकडी फळीने जोरदार प्रहार करण्यात आला होता.त्यातच अतिरक्तस्राव होऊन अमर चा मृत्यू झाला होता. ही घटना 21 मे रोजी रात्री साडे नऊ ते 22 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. याबाबत चा गुन्हा दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आपल्या सहकारी पोलीस उपनिरीक्षक भगत व अंमलदार माळगावकर, सुतार,विजय यांच्या सहकार्याने अतिवेगाने खूनाच्या घटनेचा तपास केला. गोपनीय माहिती मिळाल्यानुसार भेडशी परिसरात आरोपीचा शोध घेतला. संशयित आरोपी समीर पेडणेकर याला खालचा बाजार येथे अटक केली होती. अमर देशमाने याचा खून केल्याची कबुली समीर पेडणेकर याने पोलीस तपासात दिली होती. आज आरोपी पेडणेकर याला तपास अधिकारी पीआय निसर्ग ओतारी यांनी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता अधिक तपासासाठी पेडणेकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

error: Content is protected !!