७६ वा एसटी महामंडळाचा वर्धापन दिन फोंडाघाट स्थानकामध्ये अधिकारी- प्रवासी यांचे कडून उत्साहात साजरा
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट स्थानकाला ऐतिहासिक वारसा आहे. शिवाय ते पर्यटन जिल्हा आणि घाटमाथा यांच्या प्रवेशद्वारावरील महत्त्वाचे दुवा-स्थानक आहे. सध्या इतर घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने, या स्थानकावरून गाड्यांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक सुविधा देण्याकडे प्रशासनाचे लक्ष असून प्रवाशांनी लाल परीनेच आपला सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभागीय सांख्यिकी अधिकारी क्षमा नाडकर्णी यांनी केले आणि ७६ व्या वाढदिनी प्रवाशांना स्थानक कर्मचाऱ्यांना चालक वाहकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संपूर्ण फोंडाघाट एसटी स्थानक रांगोळी आणि माडाच्या झावळानी सुशोभित करण्यात आले होते.मान्यवरांनी केक कापून,प्रवाशांना- वाहक- चालक यांना पेढे वाटून ७६ वा महामंडळाचा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी स्थानक प्रमुख जी.के. राठोड, एस.टी. पवार,चालक- वाहक — प्रवासी- ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रवाशांनी एसटी स्थानकावरील पार्किंग ,रिक्षा- टेम्पो- पर्यटकांच्या गाड्या यामधील अरेरावी, शौचालयातील तसेच परिसरातील स्वच्छता,विहिरीवर नवीन पंप बसवु न ही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, बंदावस्थेत असलेले कॅन्टीन, परिसरात बिंदिकत बसणारे हॉकर्स, नियोजनशून्य परिसरातील अधिकृत स्टॉल व दुकाने या साऱ्या असुविधांना सामोरे जात आपले कर्तव्य बजावणारे, स्थानक प्रमुख सर्वश्री राठोड- पवार- स्वच्छता दूत संजय यांना वादातीत प्रसंगांना सामोरे जावे लागते. याचा एसटी प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले..आणि प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या ७६ व्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या.











