अग्रवाल यांनी तपास केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपीना जन्मठेप
अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या मुलाचा भाच्याच्या मदतीने महिलेने केला होता खून
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारी चा बिमोड करण्यासाठी कसून प्रयत्न करत असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जळगाव जिल्ह्यात तपास केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील खटल्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदी कार्यरत असताना आय पी एस ऑफिसर सौरभ अग्रवाल यांनी 2019 साली चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला होता. एसपी अग्रवाल यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक चोपडा, एपीआय मनोज पवार, एपीआय योगेश तांदळे यांनी केला होता. सरकारी वकील किशोर बागुल यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
या गुन्ह्यात आरोपी गीताबाई दगडू पाटील व समाधान विकास पाटील दोघे ही राहणार चहार्डी ता.चोपडा यांच्यावर जळगाव अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला चालू होता. आरोपी गीताबाई आणि तिचा भाचा समाधान यांचे अनैतिक संबंध होते.हे अनैतिक संबंध आरोपी गीताबाई हिच्या अल्पवयीन मुलाने पाहिले होते.आपले बिंब बाहेर पडू नये म्हणून आरोपी गीताबाई हिने आपला भाचा समाधान याच्या मदतीने स्वतःच्या पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून केला होता. या खटल्या चा निकाल लागला असून आरोपी गीताबाई दगडू पाटील व समाधान विकास पाटील यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर .चौधरी यांनी जन्मठेपेसह तीनशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसाची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. एसपी अग्रवाल यांचे या दमदार कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.