“बहुआयामी व्यक्तीमत्वामुळे संजय नाईक सरांनी अनेकांच्या मनात स्थान मिळविले होते “- अजयराज वराडकर

वराडकर हायस्कूल कट्टा येथे शोकसभेत नाईक सरांना आदरांजली

चौके (अमोल गोसावी) :” संजय नाईक सरांच अचानकपणे जाण हे आमच्यासाठी धक्कादायक होतं. दिलेले कोणतेही काम चोखपणे पार पाडण्यात त्यांचा हातखंडा असायचा. शिक्षण, राजकारण, समाजकारण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, साहित्य, या प्रत्येक क्षेत्रावर त्यांचा पगडा होता. बहुआयामी व्यक्तीमत्वामुळे सरांनी अनेकांच्या मनात स्थान मिळविले होते. शाळेच्या भव्यदिव्य शतकमहोत्सवाचे स्वप्न सरांनी पाहिले होते आणि त्यादृष्टीने त्यांनी कामालाही सुरुवात केली होती त्यामुळे सरांचे हे शतकमहोत्सवाचे स्वप्न सर्वांनी मिळून यशस्वी करुया हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल.” असे मनोगत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर यांनी आज वराडकर हायस्कूल कट्टा येथे संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक संजय नाईक सर यांच्या दु:खद निधनानंतर आयोजित शोकसभेत बोलताना केले.

तसेच प्रशालेतील शिक्षकांनी ” एक कल्पक मुख्याध्यापक , हरहुन्नरी आणि चमकणारा तारा आज आपल्यातून निखळला असून आम्ही अभ्यासू ,आकर्षक हसतमुख व्यक्तिमत्त्वास मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त करून ” सर तुम्ही दिलेली शिकवण आमच्या हृदयात ठेवू आणि तुमच्या आदर्शां वर पुढे वाटचाल करु.” अशी ग्वाही ही दु:खद अंत: करणाने सरांना दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर,सचिव सुनिल नाईक, श्रीमती विजयश्री देसाई,सहसचिव साबाजी गावडे, सरपंच शेखर पेणकर, माजी मुख्याध्यापक ए.डी.फणसेकर,निवृत्त लिपीक सुरेश कदम, माजी पर्यवेक्षक श्री सामंत,दादा मिठबांवकर यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी अजयराज वराडकर सुनिल नाईक,साबाजी गावडे, फणसेकर सर, सुरेश कदम , शिक्षक संजय पेंडूरकर , समीर चांदरकर , कानुरकर सर , माजी पर्यवेक्षक श्री. सामंत , विद्यार्थीनी कृतिका लोहार यांनी मनोगत व्यक्त करून नाईक सरांच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!