वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणाच्या उजव्या कालव्याचे तिरवडे तर्फ खारेपाटण येतील काजव्याचा भाग पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामध्ये अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांचे साठेलोटे आहे. असा आरोप करीत याची चौकशी करावी करावी. नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत अरुणा प्रकल्पाच्या कोणत्याही कालव्याचे काम करू देणार नाही. असा इशारा उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी प्रसिद्धीपत्रातून दिला आहे.
अरुणा प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामात सुरुवातीपासूनच अनियमितता आहे. काही कालव्याची कामे तर अगोदर करून त्यानंतर मक्ता निश्चित केला जातो. कालव्याच्या निकृष्ट कामाबाबत आपण वेळोवेळी या विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कळविले आहे.मात्र याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येते.
स्थानिक लोकप्रतिनिधीना हाताशी धरून या विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांना मॅनेज करून ही कामे दिली आहेत. ही कामे करताना कालव्याच्या मार्गावर येणाऱ्या ग्रामपंचायत व जमीन मालकांना सुद्धा विचारात न घेता ही कामे मनमानी पद्धतीने करण्यात येत आहेत. सदरील काम करतेवेळी संबंधित ठेकेदाराने निकृष्ट पद्धतीने हे काम सुरू ठेवले आहे. या कालव्याच्या साईडच्या रस्त्याच्या भरावाची दवाई न करता काम केले आहे.तसेच साईडचे पिचिंग निकृष्ट झाले आहे. त्यामुळे सदरील मातीही ढिली राहिली आहे. त्यामुळे हा कालवा पहिल्याच पावसात फुटून पावलेवाडीतील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. या सर्व कालव्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आपण कार्यकारी अभियंता, गुणनियंत्रक विभाग कोल्हापूर, प्रधान सचिव पाटबंधारे विभाग ठाणे, राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे या सर्व अरुणा प्रकल्पाचे निकृष्ट पद्धतीने चाललेल्या कामाची तक्रार करणार आहे. तसेच सदरील पावसामध्ये जो सहा किमी मधील कालवा वाहून गेला आहे. त्या कालव्याचे काँक्रिटीकरण मिश्रण बरोबर नसल्यामुळे तसेच काँक्रीट कमी दर्जाचे वापरल्यामुळे हा कालवा वाहून गेला आहे व येथील शेतकऱ्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सदरील शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळत नाही तोपर्यंत अरुणा प्रकल्पाच्या कुठल्याही कालव्याचे काम करू देणार नाही असा इशारा लोके यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे