रेल्वेत नोकरी लावतो सांगून फसवणूक

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील दोघांकडून रोख रक्कम घेत रेल्वेत नोकरीस लावतो सांगून बनावट पत्र देत फसवणूक करणाऱ्या कणकवली सिद्धार्थनगर नागवे रोड येथील रत्नू उर्फ रतन विष्णू कांबळे (४६) याला आचरा पोलिसांनी कणकवली येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन कांबळे याने पैसे घेत नोकरीस लावतो सांगून फसवणूक केली असल्याची फिर्याद नरेंद्र सुनील कोदे (रा. आचरा बाजारपेठ) यांनी आचरा पोलिसांकडे केली होती. त्यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे की, सदर इसमाने माझ्या पत्नीस कोकण रेल्वेत कमर्शियल स्टाफ व टीसी पदावर नोकरीस लावतो, असे सांगितले होते. यासाठी माझ्याकडून रोख ५० हजार व माझा मित्र ओमकार आचरेकर यालाही नोकरीस लावतो सांगून २५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर आमच्या नावे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नाव असलेल्या लेटरहेडवर आपली कोकण रेल्वेत नियुक्ती झाली असून हजर राहण्यासाठीचे पत्र पोस्टाने पाठविले. सदर पत्र हे प्रथमदर्शनी मालवणवरून पाठवले असल्याचे निदर्शनास आले. तसेच पत्रातील अधिकारी यांची सही व शिक्का स्कॅन केलेला असल्याचे दिसत असल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे आपल्या निदर्शनास आले. त्यानंतर कोदे यांनी आचरा पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी सदर इसमास कणकवली येथून शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुन सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!