कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप मधुकरराव पाटील (रा. आय्यापा मंदिर, मुक्त सैनिक वसाहत परिसर) यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झालं. कोल्हापूरहून पुणे इथं उपचारासाठी नेत असताना कराडजवळ त्यांचं शनिवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून पाटील यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. त्यांना बर वाटत असल्यानं दोन दिवसांपूर्वीच त्यांना कोल्हापुरात घरी आणलं होतं. शनिवारी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, तिथं त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्यानं पुणे इथं उपचारासाठी नेण्यात येत होतं. यावेळी कराडजवळ रस्त्यातच त्यांच निधन झालं.
दिलीप पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी खूप वर्षे काम केल. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईचे ते याचिकाकर्ते होते. मराठा आरक्षण, ई. डब्ल्यू. एस संदर्भात त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिला आहे . त्यांच्या निधनानं मराठा आरक्षण चळवळीचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.











